पिंपरी (Pclive7.com):- क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित विशेष शिष्यवृती योजना पिंपरी चिंचवड महापालिकेने राबवावी अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंचाच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर राहुल जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे.
रयत विद्यार्थी विचार मंचाच्या महापौरांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.११ ते १५ एप्रिल या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सांस्कृतिक जयंती मोहत्सव साजरा केला जातो. जयंती महोत्सवाला लाखो रुपये खर्च केले जातात. महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशात साजरी केली जाते. आणि ती करायलाच पाहिजे. परंतु आपण जर महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर आपणाला जाणवेल कि या दोन महापुरुषांनी आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्व दिल असेल तर ते म्हणजे शिक्षण..
डॉ. बाबासाहेब आंबडेकर म्हणतात कि तुमच्याकडॆ २ रुपये असतील तर तर १ रुपयाची भाकर घ्या व १ रुपयाचे पुस्तक घ्या.. भाकर तुमची भूक भागवेल व पुस्तक तुम्हाला जगायला शिकवेल. त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी देखील आयुष्यभर शिक्षणासाठी झटत राहिले. आज आपण पाहत आहोत कि २५० रुपये बस पासला नाहीत म्हणून व ४०० रुपये परीक्षा फी भरायला पैसे नाहीत म्हणून आज विद्यार्थी/विद्यार्थिनी आत्महत्या करत आहेत. शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. आज गरीब घरात अनेक हुशार विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना उच्चशिक्षण घ्यायचे असते परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना पात्रता असताना देखील शिक्षण घेता येत नाही. मग एकीकडे आपण लाखो रुपये खर्च करुन फुले व बाबासाहेब यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतो आणि त्यांच्याच महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचे असे बेहाल होत आहेत.
त्यामुळे रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने आम्ही विनंती करतो कि, जयंती महोत्सव कार्यक्रमाचा अनावश्यक खर्च टाळून अथवा विशेष तरतूद करून क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष शिष्यवृत्ती योजना तयार करण्यात यावी. त्यातून दरवर्षी उच्चशिक्षण घेणाऱ्या जातीत जास्त १० व कमीत कमी ५ विद्यार्थ्यांना ती शिष्यवृत्ती देण्यात यावी. हीच खरी क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीच्या माध्यमातून आदरांजली ठरेल. अश्या आशयाचे निवेदन रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व महापौर यांना देण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, महासचिव संतोष शिंदे, राज्य संघटक रोहित कांबळे उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group