पुणे (Pclive7.com):- अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर काँग्रेसने माजी आमदार मोहन जोशी यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता पुण्यात काँग्रेस महाआघाडीचे जोशी आणि भाजपचे गिरीष बापट यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार आहे.
भाजपने पालकमंत्री बापट यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले होते. उमेदवारीच्या स्पर्धेत जोशी यांच्यासह प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड हे इच्छुक होते. भाजपच्या उमेदवाराचा प्रचार सुरू झाला तरीही काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नव्हता. त्यामुळे सोशल माध्यमांमधून पक्षाला लक्ष केले जात होते. उमेदवार जाहीर होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मरगळ निर्माण झाली होती. ही मरगळ झटकण्यासाठी उमेदवार जाहीर नसतानाही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. बिगर नवरदेवाची वरात, अशी टीका विरोधकांकडून झाल्याने पदाधिकारी, नेते आणि इच्छुकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले होते.
अखेर काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, पुणे शहर लोकसभेसाठी काँग्रेसकडून सर्वप्रथम मोहन जोशी यांनीच उमेदवारीची इच्छ व्यक्त केली होती. त्यादृष्टीने जोशी यांनी गेल्या वर्षभरापासून तयारी सुरू केली होती. त्या तयारीचा फायदा थोडा का होईना जोशींना होणार आहे. जोशी यांना पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार, यासंबंधी ताणलेली उत्सुकता संपली आहे.























Join Our Whatsapp Group