मोशी (Pclive7.com):- आळंदीजवळील मरकळ (ता.खेड) येथील भावकीच्या शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या एका नगरसेवकासह १५ तृतीयपंथीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अद्यापी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली. ही घटना मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये घडली होती. शनिवारी रात्री आळंदी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. संतोष काळूराम लोखंडे (वय 39, मरकळ, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी भोसरीतील भाजपाचे नगरसेवक रवी लक्ष्मण लांडगे (रा. धावडे वस्ती, भोसरी) यांच्यासह आनंद बारकू लोखंडे, शुभेस मुकेश लोखंडे, अविनाश मुकेश लोखंडे, लता मुकेश लोखंडे, नियती शिंदे यांच्यासह पंधरा तृतीयपंथीयांवर आळंदी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी संतोष लोखंडे यांच्या मालकीच्या मरकळ येथील जमिनीत मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या भावकीतील लोकांची भांडणे झाली होती. या वेळी रवी लांडगे आणि नियती शिंदे यांच्यासह पंधरा तृतीयपंथी, आरोपी लोखंडे सर्व जणांनी मिळून जेसीबीच्या साहाय्याने फिर्यादी संतोष लोखंडे यांच्या जमिनीत प्रवेश करत ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता.
त्यांना विरोध करणार्या फिर्यादी लोखंडे यांची आई मालन लोखंडे, ज्योत्स्ना लोखंडे, सुनील लोखंडे, शोभा लोखंडे, निखिल लोखंडे यांना आरोपींनी दमदाटी करून मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे
























Join Our Whatsapp Group