पिंपरी (Pclive7.com):- एकेकाळी राष्ट्रवादीचा गड असलेल्या पिंपरी विधानसभेवर पुन्हा ‘भगवा’ फडकविण्यासाठी शिवसेनेने विद्यमान गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सेनेचे मनसुबे उधळून टाकण्यासाठी राष्ट्रवादीकडून ‘व्युहरचना’ आखली जात आहे. पिंपरीतून उमेदवारीसाठी माजी आमदार आण्णा बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, युवा नेते शेखर ओव्हाळ यांच्या नावात सध्या चर्चा सुरू आहे. आता राष्ट्रवादी नेमकं कोणाला रिंगणात उतरविणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान इच्छुकांकडून मात्र उमेदवारीसाठी जोरदार ‘फिल्डींग’ लावली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ म्हणून पिंपरी विधानसभा ओळखला जातो. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. गौतम चाबुकस्वार यांनी युती नसतानाही शिवसेनेच्या तिकीटावर निवडून येत सर्वांनाच ‘धक्का’ दिला होता. लोकसभा निवडणुकीतही मोठं मताधिक्य शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंना पिंपरीतून मिळाले होते. त्यात गौतम चाबुकस्वारांचा मोठा वाटा होता. त्याचमुळे आमदार चाबुकस्वार यांना सेनेकडून पुन्हा रिंगणात उतरवण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादीने देखील हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्याची ‘रणनिती’ आखली आहे.
पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादीकडून तगडे उमेदवार इच्छुक आहेत. त्यात माजी आमदार आण्णा बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत, युवानेते शेखर ओव्हाळ यांची नावे रेसमध्ये आहेत. आण्णा बनसोडे यांना उमेदवारी पुन्हा मिळेल असा विश्वास आहे. माजी आमदार असल्यामुळे असलेला जनसंपर्क, तसेच मनी, मस्सलने ‘स्ट्राँग’ आहेत. तर युवानेते माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी देखील गेल्या ६ महिन्यांपासून जोरदार तयारी केलीयं. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न केलायं. मोठा युवा वर्ग त्यांच्या पाठीशी असून उमेदवारी त्यांनाच मिळेल असा विश्वास शेखर ओव्हाळ यांना आहे.
दरम्यान, आण्णा बनसोडे आणि शेखर ओव्हाळ यांच्यात उमेदवारीसाठी चुरस सुरू असताना राष्ट्रवादीकडून सुलक्षणा शिलवंत-धर यांचे नाव अचानकपणे पुढे आले आहे. त्या संत तुकारामनगर येथून नगरसेविका म्हणून पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. मात्र गेल्या अडीच-तीन वर्षात महापालिकेत त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. सुसंस्कृत, अभ्यासू महिला चेहरा म्हणून त्या पुढे आल्या आहेत. शिलवंत यांनी देखील पिंपरीतून जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं कुणाला रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या एक-दोन दिवसात याबाबत घोषणा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र तूर्तास तरी पिंपरीतून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.























Join Our Whatsapp Group