पिंपरी (Pclive7.com):- राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे व जिल्हा क्रीडा परिषद मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपद पटकावले. मुंबई येथील वर्सोवा येथे झालेल्या या स्पर्धेतील विजेत्या संघाचा आंतरराष्ट्रीय कबड्डी पटू रिशांक देवाडीगा यांच्या हस्ते करंडक देवून सन्मान करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माध्यमिक विद्यालय थेरगावचा १७ वर्षाखालील मुलीचा संघ शालेय राज्यस्तर कबड्डी स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी ही सहभागी झाला होता. प्रतिस्पर्धी अमरावती संघाचा २९-१४ गुणांनी पराभव करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. संघाची कप्तान मनीषा राठोड व उत्कृष्ट खेळाडू सह क्रीडा शिक्षक बन्सी आवटे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सोनाली जाधव, कृष्णराव टकले, तात्या बारणे व प्रभारी मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम आदी उपस्थित होते.
अंतिम सामन्यात संघनायिका मनिषा राठोड हिने अष्टपैलू खेळ करत उत्कृष्ट पकड व चढाई केली.या संघातील चांदणी गायकवाड, शिफारस वरणाद ,रूपाली डोंगरे, भूमिका गोरे यांच्या उत्कृष्ट खेळामुळे त्यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी त्या पूर्व प्रशिक्षणासाठी कर्नाटकात निवड झाली आहे. या विजयी संघामध्ये पूजा तेलंग, तेजल महाजन, सखुबाई जाधव, सविता गवई, विद्या गायकवाड, निकीता माळी व कोमल राठोड यांचा समावेश आहे. क्रीडा शिक्षक बन्सी आवटे व सोनाली जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, रज्जाक पानसरे यांचे सहकार्य या संघाला लाभले.






















Join Our Whatsapp Group