पिंपरी (Pclive7.com):- राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात महाशिवआघाडी तयार होण्याच्या मार्गावर आहे. त्यापूर्वीच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आघाडी झाल्याचे पहायला मिळाले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार माई काटे यांना मतदान केले. दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार माई काटे यांचा पराभव झाला असला तरी येत्या काळात शहरातील राजकीय चित्र बदलणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणुक आज पार पडली. महापालिकेत स्पष्ट बहुमत असल्यामुळे भाजपाच्या उमेदवार माई ढोरे यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतू राष्ट्रवादीने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार न घेतल्याने मतदान प्रक्रीया पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ३५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या माई काटे यांना मतदान केले. तर शिवसेनेच्या सभागृहात हजर असलेल्या ६ नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे माई काटे यांना एकूण ४१ मते मिळाली. तर भाजपाच्या उमेदवार माई ढोरे यांना अपक्षांच्या पाठींब्यासह ८१ मते मिळाली. या लढतीत भाजपाच्या माई ढोरे ४० मतांनी विजयी झाल्या.
राज्याच सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाशिवआघाडी स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू अाहे. त्याचपूर्वी पिंपरीत महापौर निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील ‘मैत्रीपूर्ण आघाडी’ पहायला मिळाली आहे. तुर्तास या आघाडीचा महापालिकेतील सत्ता समीकरणात काही फरक पडत नसला तरी, येत्या काळात शहरातील राजकीय समीकरणे बदण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पक्षादेश आल्यामुळेच शिवसेनेने राष्ट्रवादीला मतदान केले..!
शिवसेनेत पक्षादेशाला महत्व आहे. महापौर निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित होता. मात्र काल रात्री उशिरा निवडणुकीसंदर्भात पक्षादेश आला. त्यानुसारच शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना राष्ट्रवादीला मतदान करण्याचा ‘व्हिप’ बजावला. त्याप्रमाणेच सभागृहात हजर असलेल्या शिवसेनेच्या ६ नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले.
– राहुल कलाटे
(गटनेता-शिवसेना)
























Join Our Whatsapp Group