पिंपरी (Pclive7.com):- चाकण एमआयडीसीमध्ये बिरदवडी (ता.खेड) गावच्या हद्दीतील एका कंपनीत शिरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दगडांनी ठेचून कंपनी मालकाचा खून केला. ही घटना सोमवारी (दि.१७) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
चाकण एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा ठेकेदारीसह वेगवेगळ्या कारणांनी दहशतीचा थरार सुरू झाला आहे. हरिश्चंद्र किसनराव देठे (वय ४५ , सध्या रा. विश्रांतवाडी, पुणे, मूळ रा.रुई, जि.उस्मानाबाद) असे खून झालेल्या कंपनी मालकाचे नाव आहे. प्रमोद कोल्हे (वय २७, रा.चाकण) यांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकण एमआयडीसीत व्ही.एच.डी. इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मालक हरीश्चंद्र देठे हे असून, सकाळी ते नेहमी प्रमाणे कंपनीत आले होते. त्यावेळी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आलेल्या काही जणांशी त्यांचा वाद झाला. दुपारी तीनच्या सुमारास पाच ते सहाजण कंपनीच्या गेटवर आले. त्यांनी दगडफेक सुरू केली. कंपनीचे मालक देठे बाहेर आल्यानंतर संबंधित पाच ते सहा जणांनी दगडाने ठेचून त्यांचा खून केला.
त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. जखमी देठे यांना तत्काळ येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान, हल्लेखोर हे अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालक असल्याची माहिती मिळत आहे.





















Join Our Whatsapp Group