
पिंपरी (Pclive7.com):- कोरोना सारख्या मोठ्या संकटाला थोपविण्यासाठी ‘जनता कर्फ्य’चं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्याबरोबरच शहरातील गुन्हेगारीला ‘ब्रेक’ लावण्याचं काम ‘जनता कर्फ्य’नं केलं आहे. उद्योगनगरी आणि अलिकेच गुन्हेगारीनगरी अशी ओळख होत चाललेल्या पिंपरी चिंचवड शहरात काल रविवारी (दि.२२ रोजी) एकही गुन्हा घडला नाही. शहरात काल दिवस-रात्र ‘जनता कर्फ्यू’ होता. सर्व पोलीस यंत्रणा रस्त्यावर होती. कोरोनाला घाबरल्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरात होता. त्यामुळे रविवारी एकही गुन्हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्याची नोंद नाही. हा देखील एक नवीन विक्रमच घडला असं म्हणावं लागेल.
देशावर सध्या कोरोनाचं संकट ओढावलयं. महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण पिंपरी चिंचवडमध्ये असल्याचं समोर आलयं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दि.२२ रोजी संपूर्ण देशात ‘जनता कर्फ्य’ची घोषणा केली होती. त्यानुसार पिंपरी चिंचवडकरांनी देखील कोरोनाला हद्दपार करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्व नागरिक काल दिवसरात्र घरातून बाहेर पडलेच नाहीत. आणि त्यामुळेच दिवसभरात कोणताही गुन्हा शहरात घडलाच नाही. चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, हाणामारी अशा स्वरूपाचे गुन्हे शहरात दररोज मोठ्या प्रमाणात घडत असतात. मात्र काल कुठलाच गुन्हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडला नाही. त्यामुळे ‘जनता कर्फ्य’चा फायदा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी झाला खरा, पण त्याच बरोबर शहरातील गुन्हेगारीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी सर्वाधिक उपयोग झाला असंच म्हणावे लागेल.
























Join Our Whatsapp Group