शासनाच्या ताब्यातील ५९ एकर गायरान जमीन महापालिकेला हस्तांतरित
पिंपरी (Pclive7.com):- तळवडे येथील शासनाच्या ताब्यातील गायरान जमीन २३ हेक्टर ३० आर म्हणजेच ५९ एकर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मोलाच्या सहकार्याने व नगरसेवक पंकज भालेकर यांच्या विशेष प्रयत्नाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील शासनाकडून महानगरपालिकेस हस्तांतरित करण्यात आलेल्या जमिनीपैकी सर्वात मोठे क्षेत्र विनामोबदला सार्वजनिक प्रयोजनासाठी मनपास देण्यात आलेे आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी आदेश काढून गायरान जमीन मनपास हस्तांतरित करण्याची कार्यवाही केली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शासनाच्या वतीने सदरचा आदेश नगरसेवक पंकज भालेकर यांच्याकडे सुपूर्त केला.
याबाबत बोलताना नगरसेवक पंकज भालेकर म्हणाले की, जमीन हस्तांतरणाच्या कामासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रथम पत्र दिले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना याबाबतचे पत्र दिले. अजितदादांच्या माध्यमातून शासनाच्या महसूल विभागाशी संपर्क साधून पाठपुरावा केला. यादरम्यान महसूल विभागाने विभागीय आयुक्त पुणे यांना सदरची जागा सार्वजनिक प्रयोजनासाठी आहे काय याबाबत खुलासा मागविला होता. विभागीय आयुक्त पुणे यांचेकडून सकारात्मक खुलासा आल्यानंतर अजितदादा पवार यांनी वित्त विभागास सदरची जागा सार्वजनिक प्रयोजनासाठी असल्यामुळे विनामोबदला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ताब्यात देण्याकरिता सूचना दिल्या. तसेच नगर विकास विभागाकडून सकारात्मक पावले उचलणे करिता अजितदादांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. महसुल विभागाने जागा पिंपरी चिंचवड मनपाच्या ताब्यात देण्याकरिता प्रस्ताव तयार केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महसुल मंत्री व मुख्यमंत्री यांची प्रस्तावावर सही होण्यास मोलाचे सहकार्य केले. व आज दि.17 डिसेंबर 2020 रोजी महसुल विभागाने याबाबतचा आदेश काढून अजितदादा पवार यांनी शासनातर्फे माझ्याकडे सुपुर्त केला आहे. त्यामुळे सदर ठिकाणी मनपामार्फत पर्यावरण पुरक उद्यान व मैदान विकसित करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.