पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील ‘बोगस एफडीआर’ प्रकरण सध्या चांगले गाजले आहे. बोगस एफडीआर आणि बँक हमी देवून टेंडर घेणा-या १८ ठेकेदारांवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या ठेकेदारांना काळ्यात यादीत टाकले आहे. ३ वर्ष महापालिकेच्या निविदा भरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सर्वच ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिकेतील कामांचे टेंडर मिळविताना फिक्स्ड डिपॉझिट रिसीट (एफडीआर) आणि बँक हमी देणे बंधनकारक असते. मात्र १८ ठेकेदारांनी १०७ टेंडरमध्ये बोगस एफडीआर आणि बँक हमी दिल्याची माहिती समोर आली. या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थायी समितीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले होते.
त्यानुसार प्रशासनाने हालचाली करत कारवाई सुरु केली आहे. काळ्यात यादीत टाकले जाणा-या ठेकेदारांची नावे दिली आहेत. त्यांना महापालिकेची निविदा भरण्यास तीन वर्ष प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
हे १८ ठेकेदार काळ्या यादीत..!
श्री दत्त कृपा एंटरप्रायजेस, सोपान जनार्दन घोडके, दीप एंटरप्रायजेस, बीके खोसे, बीके कन्स्ट्रक्शन अॅण्ड इंजिनिअरिंग, एचए भोसले, भैरवनाथ कन्सट्रक्शन, कृती कन्स्ट्रक्शन, डीजे एंटरप्रायजेस, म्हाळसा कन्सट्रक्शन प्रा. लि, अतुल आरएमसी, पाटील अॅण्ड असोसिएट, डीडी कन्स्ट्रक्शन, एसबी सवाई, चैतन्य एंटरप्रायजेस, वैदही कन्स्ट्रक्शन, त्रिमुर्ती कन्स्ट्रक्शन आणि राधिका कन्स्ट्रक्शन या १८ ठेकेदारांना काळ्यात यादीत टाकले आहे. त्यांना ३ वर्ष महापालिकेच्या निविदा भरण्यास प्रतिबंध केले आहे.