पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराची वाढलेली लोकसंख्या, भविष्यात महापालिकेचा होणारा विस्तार आणि कार्यक्षेत्रात होणारी वाढ विचारात घेवून महापालिकेने दोन उपआयुक्त व चार सहाय्यक आयुक्त पदांची निमिर्ती करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यास सरकारने मान्यता दिली आहे.
त्यानुसार महापालिकेत आता १० उपआयुक्त आणि १४ सहाय्यक आयुक्त असणार आहेत. त्यात राज्य व महापालिका सेवेतील प्रत्येकी पाच उपआयुक्त व सात सहाय्यक आयुक्त असतील.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश आहे. त्यानुसार अधिकारी वर्गाचा नवीन आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियमांना मंजुरी मिळाली आहे. नवीन आकृतीबंधानुसार उपआयुक्तांच्या पदाची निर्मिती झाली आहे. सध्या आठ उपआयुक्त व १० सहाय्यक आयुक्त पदे आहेत. त्यात आता अनुक्रमे दोन व चार पदांची भर पडली आहे. मात्र, सध्या राज्य सेवेतील दोन व पालिका सेवेतील एक पद रिक्त आहे.
राज्य सेवेतील महापालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेले प्रशासन विभागाचे उपआयुक्त सुभाष इंगळे, नागरवस्ती विभागाचे अजय चारठणकर आणि कर आकारणी व संकलन विभागाच्या स्मिता झगडे महापालिकेत कार्यरत आहेत. राज्य सेवेतील २ उपआयुक्तपदे रिक्त आहेत.
तर, महापालिका सेवेतील भांडार विभागाचे मनोज लोणकर, कायदा विभागाचे चंद्रकांत इंदलकर, सुरक्षा विभागाच्या आशादेवी दुरगुडे आणि क्रीडा विभागाचे संदीप खोत असे ४ उपआयुक्त कार्यरत आहेत. पालिका सेवेतील अधिका-यासाठीचे १ पद रिक्त आहे.
राज्य सेवेतील एलबीटी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील आलमलेकर, निवडणूक विभागाचे बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, प्रशासन विभागातील सुषमा शिंदे, आकाश चिन्ह परवाना विभागाचे निलेश देशमुख, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे उमाकांत गायकवाड, शिक्षण विभागाच्या ज्योत्स्ना शिंदे असे ७ जण कार्यरत आहेत. राज्य सेवेतील कोटा फुल झाला आहे.
तर, महापालिका सेवेतील ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे अण्णा बोदडे, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे श्रीनिवास दांगट आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे सिताराम बहुरे असे ३ जण सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. महापालिका सेवेतील अधिका-यांसाठी राखीव असलेली ४ सहाय्यक आयुक्तपदे रिक्त आहेत.
























Join Our Whatsapp Group