पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमध्ये आत्तापर्यंत आरटीई प्रवेशाच्या ३ हजार ४६४ जागांपैकी २ हजार ४७० जागांवर प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. शाळा सुरू होऊन तीन महिन्यानंतरही अद्याप आरटीईच्या ९९४ जागा शिल्लक आहेत. यामध्ये प्रवेश रद्द झालेल्यांची सुनावणी सुरु असल्याने अद्याप प्राधान्यक्रम फेरी सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्या पाल्यांचे प्रवेश झालेले नाहीत त्यांना प्राधान्यक्रम फेरीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आरटीईचे रिक्त प्रवेश पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाचे उप आयुक्त संदीप खोत यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज केलेल्या १३८ पालकांचे अर्ज कागदपत्रांची पूर्तता आणि इतर इतर कारणांसाठी रद्द करण्यात आले आहेत. या पालकांची सध्या सुनावणी सुरू आहे. यातील कागदपत्रांतील त्रुटींची आणि चुकांची दुरुस्ती झाल्यानंतर विद्यार्थ्यास प्रवेशास पात्र ठरविले जाणार आहे. तसे नसल्यास प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याने जोपर्यंत प्रवेश रद्द केलेल्यांची सुनावणी झाल्यानंतर प्राधान्यक्रम फेरी सुरु करण्यात येणार आहे.
शाळांच्या मनमानी कारभारामुळे बरेचसे विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित असल्यामुळे पहिल्या फेरीत मुदतवाढ देऊनही कमी विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तसेच यंदा काही शाळा बंद व स्थलांतरित झाल्यामुळेही आरटीई प्रवेशावर परिणाम झालेला आहे. कागदपत्रांची काही अडचणी, धावपळ लक्षात घेऊन ही मुदत वाढ देण्यात आली होती. वास्तविक, प्रवेशासाठी काही कारणावरून पालकांची अडवणूक करीत आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत शिक्षण विभागाने तात्काळ कार्यवाही करावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा, असेही प्रा. सोनाली गव्हाणे यांनी म्हटले आहे.
























Join Our Whatsapp Group