पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री ही आपलेच आहेत त्यांना सांगा त्यांनी ऐकावे लागेल. आपल्याला एकत्र काम करायचं आहे. सेनेच्या कार्यकर्त्यांना नाराज करु नका, अजित पवार ही मुख्यमंत्र्यांचं ऐकतात, नाहीतर मुख्यमंत्री आज दिल्लीत गेले आहेत. असा चिमटा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी बोलताना काढला. भोसरीमध्ये आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शरद सोनावणे, शहरप्रमुख सचिन भोसले, सुलभा उबाळे, राहुल कलाटे, योगेश बाबर, धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.
पुणे, पिंंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर झाला नाही ही आमची खंत आहे. पण येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे ही अपेक्षा ठेवली तर काय चुकलं असा सवाल राऊत यांनी केला. येत्या निवडणुकीसाठी आपण एकट्याने लढण्याची तयारी केली पाहिजे. सोबत आलात तर तुमच्या सोबत नाही तर तुमच्याशिवाय, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महापालिका एकट्याने लढण्याचे आवाहन केले.
पुण्याच्या पालकमंत्र्यांच्या दराऱ्याला घाबरु नका. भोसरी विधानसभेत शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून न येणे याची शिवसेनेसाठी मोठी खंत आहे. म्हणून आता भोसरीतून शिवसेनेला काम सुरु करायला हवं. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. ५५ जागांवर आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, तर ४०-५० जागांवर शिवसेनेचा महापौर होणार नाही का, असेही राऊत म्हणाले.





















Join Our Whatsapp Group