पिंपरी (Pclive7.com):- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळातील विरोधी नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. अशी माहिती उच्चस्तरीय चौकशीमध्ये आढळली असल्याचा दावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे पुण्याच्या तात्कालिन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर शनिवारी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शुक्ला या जबाबदार पदावर कार्यरत असताना त्यांनी कोणाच्या आदेशाने किंवा दबावाने हे काम केले हे देशातील नागरिकांच्या पुढे आले पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळातील झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. आता या सर्व कृत्यांमागील खऱ्या सूत्रधारांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
या पत्रकात डॉ. कदम यांनी पुढे म्हटले आहे की, फोन टॅपिंग प्रकरण हे भाजपाचे गुजरात मॉडेल आहे. भाजपने गुजरातमध्ये देखील विरोधकांचा आवाज दाबून वेळ प्रसंगी ब्लॅकमेलिंग करून सत्ता काबिज केली आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आले होते. याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेतही मुद्दा उपस्थित करुन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती.
आता या चौकशीतून हे फोन टॅपिंगचे रेकॉर्ड त्यांनी कोणाला दिले? मुळ उद्देश काय होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील जनतेला मिळाली पाहिजेत. यावेळी राज्याचे गृहमंत्री पद तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होते त्यामुळे याविषयावर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली आहे.
























Join Our Whatsapp Group