पिंपरी (Pclive7.com):- पूर्णानगर येथील उद्यान उद्घाटन कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर येत परस्परविरोधी घोषणाबाजी केली. एकमेकांच्या अंगावर धावून येत राडा घातला. याप्रकरणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सचिन देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुशाग्र अशोक कदम (रा. साई मंगल हौसिंग सोसायटी, संभाजीनगर, चिंचवड ) यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा ते पंधरा पुरुष व महिला कार्यकर्ते तसेच मोतीराम रावसाहेब पवार (रा. पूर्णानगर, चिंचवड) यासह भाजपचे दहा ते पंधरा पुरुष कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी पर्यटन केंद्राचे उद्घाटन रविवारी (ता. ६) सायंकाळी पाचच्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. परस्परविरोधी घोषणा दिल्या. त्यांच्यात शाब्दिक चकमकही झाली.
दरम्यान, आक्रमक होऊन एकमेकांच्या अंगावर धावून आले. यादरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग करून गोंधळ घातल्याप्रकरणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.