पिंपरी (Pclive7.com):- (रोहित आठवले) :- तुमची बदली होणार आहे.. आज संध्याकाळी त्याबाबतचे आदेश होतील.. तुम्हाला कुठे नियुक्ती हवी आहे? देण्या-घेण्याचे काय? मला पैशाची गरज नाही परंतु सीपी साहेबांना द्यावे लागतील. त्याशिवाय बदली आदेशावर सही होणार नाही.. असे सांगत महिला पोलिस हवालदाराकडून खंडणी उकळण्यात आल्याचा आणि याच प्रकारे अनेक पोलिसांना फोन करून पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड मध्ये घडला आहे.

याबाबतचा घटनाक्रम असा की, भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यांमध्ये “पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षातून निरीक्षक पाटील” बोलत असल्याचे भासवणारा एक फोन शुक्रवारी करण्यात आला. ड्युटी ऑफिसर (कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन ड्युटी लावणारे कर्मचारी) कोण आहे, असे विचारत त्यांचा नंबर घेण्यात आला.
त्यानंतर या संबंधित कर्मचाऱ्याला फोन करून भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये तीन किंवा पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी संबंधित आरोपीने मागितली. नियंत्रण कक्षातून निरीक्षक दर्जाच्या अधिकारी बोलत असल्याचे सांगणारा फोन आल्याने संबंधित कर्मचाऱ्याने देखील तीन ते पाच वर्ष कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी संबंधिताला व्हाट्सअप वर पाठवून दिली.
धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर निरीक्षक पाटील बोलत असल्याचे सांगणाऱ्या आरोपीने या यादीतील कर्मचाऱ्यांना फोन करून “तुमचा कालावधी पूर्ण झाला आहे.. आज बदलीचे आदेश होणार आहेत. तुमची इच्छा कुठल्या ठिकाणी काम करण्याची आहे.. त्यासाठी पैसे द्यावे लागतील; हे पैसे मला नको आहे.. साहेबांना द्यावे लागतील.. पैसे न दिल्यास साहेबांची सही होणार नाही” असे धमकावण्यात आले.
या सर्व प्रकारानंतर फोन आलेल्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क केला. काही जणांनी तर रक्कम कमी करण्यासाठी संबंधितांशी तडजोड होते का चाचपडले. परंतु संबंधित महिला हवालदाराने घरापासून लांब नियुक्ती होऊ नये या भीतीपोटी पोलिस निरीक्षक असल्याचे भासणार्या संबंधित आरोपीच्या मोबाईलवर गुगल पे द्वारे पाच हजार रुपये पाठवून दिले. आरोपीने फोन केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पंधरा ते पंचवीस हजार रुपये पर्यंतची मागणी केल्याचे समजते.
हा सर्व प्रकार कर्मचाऱ्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कानावर घातल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्वतः पोलिस आयुक्तांनी तत्काळ याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन आरोपींच्या मागावर खरे पोलिस तपासासाठी पाठवून दिले आहेत.
भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत संबंधितावर खंडणी, फसवणूक, पोलिस असल्याची बतावणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित महिला हवालदाराने फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी घडलेल्या या प्रकाराची शहर पोलिस दलात खमंग चर्चा रंगली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.
























Join Our Whatsapp Group