पिंपरी (Pclive7.com):- सध्या पवना नदीतून ५१० एमएलडीच पाणी उचलले जात आहे. शहरात नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी हे पाणी कमी पडत आहे. त्यामुळे आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम एप्रिल अखेर किंवा मेपर्यंत पूर्ण होईल. आंध्रा धरणातून आलेले १०० एमएलडी पाणी समाविष्ट गावांना दिल्यानंतर पवना धरणातील पाण्याचा ताण कमी होईल. त्यामुळे शिल्लक पाणी शहरातील विविध भागांना नियमित पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा व स्थायी समितीची सभा बुधवारी झाली. त्यानंतर आयुक्त पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, पिंपरी चिंचवडमध्ये पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून महापालिकेने पाणीपुरवठ्याची वेगवेगळी कामे हाती घेतली आहेत. चिखलीतील जलशुद्धीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जॅकवेल जोडणे, जागा ताब्यात घेणे, एमआयडीसी हद्दीतील जागा घेणे, केबल, पाईपलाईनची निविदा प्रक्रिया राबविली. काही निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फेरनिविदा काढाव्या लागल्या. परवानगी वेळेवर मिळत नाहीत. पाणीपुरवठा प्रकल्प रेंगाळला आहे. प्रकल्प लवकर मार्गी लागण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. परवानगीच्या गोष्टी महापालिकेच्या हातात नाहीत. त्यामुळे टाईमलाईन सांगता येत नाही.
आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम एप्रिल अखेर किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपेल. चाचणी करणे, पाणी आणून त्याचे वितरण करणे यात कालावधी जाईल. वाढीव पाणी आल्यानंतर दररोज पाणीपुरवठा केला जाणार नाही. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून परिसरातील भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
पाणीपुरवठ्याविषयीच्या तक्रारींचे निराकरण करताना शहरातील पाण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात टप्प्या टप्प्याने पाणीपुरवठा केला जाईल. दररोज पाणी देण्याचा विषय फसवा आहे. उंच सखल भागात पाणी कसे सुयोग्य पद्धतीने देता येईल, याचे सर्वेक्षण आणि अभ्यास सुरू आहे.– राजेश पाटील, आयुक्त
























Join Our Whatsapp Group