मुंबई (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. आपण मुलं पळवणाऱ्या टोळीबद्दल ऐकलं होतं. मात्र, सध्या महाराष्ट्रात बाप पळवणारी टोळी फिरत आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. ते आज मुंबईत गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, मी व्यासपीठावर आल्यावर दोन गोष्टी पहिल्या, एक म्हणजे रिकामी खुर्ची जी संजय राऊतांची आहे. यामुळे मी एक खुलासा करून टाकतो, नाहीतर उद्या बातमी यायची संजय राऊत मिंधे गटात गेले. खरं तर, मिंधे सगळे तिकडे गेले आहेत. पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही, या निश्चयाने लढत आहेत. या लढाईत ते आमच्यासोबत असून तलवार हातात घेऊन आघाडीवर लढत आहेत.
दुसरं व्यासपीठावर आल्यावर मी बघितलं की, आमचे वडील जागेवर आहेत का? कारण मुलं पळवणारी टोळी आपण ऐकली आहे. पण सध्या महाराष्ट्रात बाप पळवणारी अवलादी फिरत आहेत. एवढी वर्षे आपण सर्वांनी ज्यांना सत्तेचं दूध पाजलं, आता त्याच लोकांनी तोंडाची गटारगंगा उघडली आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावरून जोरदार टीका करतना म्हटलं की, मुंबईवरती सध्या गिधाडं फिरायला लागली आहेत. त्यांना मुंबई बळकावयाची आहे. मुंबईवर लचके तोडणारी गिधाडांची अवलाद फिरायला लागली आहे. अमित शाह मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असं विधान केलं. त्यांनी आम्हाला जरूर जमीन दाखवावी, पण आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही.
अमित शाहांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत-वाचत आम्ही मोठे झालेलो शिवसैनिक आहोत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह स्वराज्यावर चालून आले होते. त्याच कुळातले आताचे शाह म्हणजे अमित शाह मुंबईवर चालून आले आहेत. देशाचे गृहमंत्री असूनही मुंबईत येऊन ते काय बोलून गेले? तर शिवसेनेला जमीन दाखवा. पण त्यांना माहीत नाही, इकडे जमिनीतून फक्त गवताची पाती उगवत नाहीत, तर तलवारीची पातीही उगवतात. तुम्ही आम्हाला जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, पण आम्ही तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे आज मी ठणकावून सांगतोय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मी गिधाडं हा शब्द मुद्दाम वापरला आहे, कारण निवडणूक आल्यावर त्यांना मुंबई दिसते. पण जेव्हा मुंबईवर संकटं येतात, तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? यांच्यासाठी मुंबई ही केवळं विकण्यासाठी मिळालेली स्वेअर फुटातील जमीन असेल. पण ही आमच्यासाठी केवळ जमीन नाही, मातृभूमी आहे. १०५ वीरांनी बलिदान देऊन मिळवलेली मातृभूमी आहे, असं उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले.
























Join Our Whatsapp Group