पिंपरी (Pclive7.com):- पिस्तुलाचा धाक दाखवून रिक्षा चालकांना लुटणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख ६१ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.

संभाजी शिवाजी जाधव (वय ३४), दत्तात्रय ज्ञानोबा बलकवडे (४५, दोघेही रा. पौड) आणि सुनील बबन पवार (३७, रा. माण-मुळशी, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी टिपटॉप हॉटेल समोर एका नागरिकाला दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी मारहाण करून लुटले. या गुन्ह्याचा तपास करीत असताना वाकड आणि डेक्कन पोलिस ठाण्यातही अशाच वर्णनाच्या चोरट्यांनी लुटमार केल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींचा येण्याचा आणि जाण्याचा मार्ग निश्चित केला.
दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी सहायक निरीक्षक सागर काटे यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी माण या ठिकाणी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. पोलिस तपासात आरोपींनी केलेले तीन गुन्हे उघड झाले असून एकूण एक लाख ६१ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, उपनिरीक्षक रमेश पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
























Join Our Whatsapp Group