पिंपरी (Pclive7.com):- महानगरपालिकेने सुरु केलेला “लाईट हाऊस” हा उपक्रम वाखाणण्यासारखा असून गरजू युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केलेली प्रशिक्षणाची सोय समाज उन्नतीसाठी लाभदायक ठरणारी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथील समाज विकास विभागाच्या उपक्रमातील लाईट हाऊस प्रकल्पास प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी भेट देऊन प्रकल्पाचे पाहणी केली, त्यावेळी उपक्रमाचे कौतुक करताना त्या बोलत होत्या.
यावेळी महाराष्ट्र शासनाचे सहसचिव प्रमोद शिंदे, उपसचिव विनीत मानपुरे, अनुपमा पवार, चंद्रकांत निनाळे, वामन कोठेकर, समाज विकास विभागाचे उप सचिव चंद्रकांत इंदलकर, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपूरे, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, व्हाईट हाऊसचे प्रशिक्षक, प्रक्षिक्षणार्थी उपस्थित होते.
पिंपरी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे मार्च २०२१ पासून लाईट हाऊस प्रकल्प सुरु आहे. यामध्ये युवक युवतींना फाऊंडेशन कोर्स, समुपदेशन, व्यावसायिक प्रशिक्षण आणि नोकरी मिळविणे याबाबत मार्गदर्शन केले जाते. फाऊंडेशन कोर्समधून १२५ तासांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यामध्ये व्यक्तीमत्व विकासावर भर देण्यात येतो. युवकांना त्यांची क्षमता, बुध्दीमत्ता आणि कौशल्य विकसीत करण्यासाठी तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन करण्यात येते. या फाऊंडेशन कोर्सनंतर समुपदेशन करण्यात येते. त्यामध्ये युवकांना निवडीचे स्वातंत्र्य आणि दृढ विश्वास यावर समुपदेशन करण्यात येते. बाजारातील उपलब्ध संधी न परिस्थितीचा ताळमेळ यावर मार्गदर्शन करण्यात येते. समुपदेशनानंतर व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. संगणकाचे युग असल्याने डाटा एंट्री, अकौऊंटींग, ऑफिस व्यवस्थापन, फॅशन डिझाईनींग आणि ब्युटीशियन ह्या बाबत प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणानंतर नोकरी मिळणेसाठी मार्गदर्शन करण्यात येते. बायोडेटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करुन घेणे, मुलाखतीची प्रक्रीया, कोचींग या बाबत विस्तृत मार्गदर्शन केले जाते. गरज पडल्यावर युवकास अथवा कुटुंबियांस समूपदेशन केले जाते अथवा व्यावसायिक मार्गदर्शन केले जाते.
प्रधान सचिव मनिषा वर्मा यांचे स्वागत तसेच प्रास्ताविक महापालिकेचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
























Join Our Whatsapp Group