पिंपरी (Pclive7.com):- दहा दिवसांपूर्वी तळेगाव दाभाडे येथे पडलेल्या दरोड्यातील पाच आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून १२ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. आरोपींकडून १९ तोळे सोन्याचे दागिन्यांसह एकूण २५.२७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अमर दहातोंडे (वय २० रा. वडाळा, अहमदनगर), मस्के (वय ३०, रा. बर्गे वस्ती, ता. खेड), राजू यादव (वय ४२) सोपान ढवळे (वय २४) आणि प्रशांत काकडे (वय ३०, तिघेही रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. १० जानेवारी रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा आरोपींनी दरोडा टाकून २४ तोळे सोने व रोख रक्कम लुटून नेली होती. यामधील आरोपी राजू यादव हा अलिबाग पोलीस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यातील सराईत आरोपी असून २०२० रोजी तो जामिनावर सुटला आहे. तसेच, आरोपी अनिल मस्के हा देखील जामिनावर सुटलेला गुन्हेगार आहे असे पोलिसानी केलेल्या तपासात समोर आले आहे.
आरोपी राजू यादव आणि सोपान ढोले यांना हॉटेल सुरू करण्यासाठी पैशांची गरज होती. पैशांची जमवाजमव करताना त्यांच्या लक्षात आले, की तळेगाव परिसरात फिर्यादी यांचे पूर्वी गुटख्याचे दुकान होते. त्यांच्याकडे काळा पैसा दडवून ठेवला आहे. त्यामुळे आरोपीनी कट करून हा दरोडा टाकला.
ही कारवाई करत असताना पोलिसांनी आयुक्तालय हद्दीतील १२ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, ऋलीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, सुधिर दांगट, महेश भालचिम, विठठल सानप, समीर काळे, निखील फापाळे, शशिकांत नांगरे, रामदास मेरगळ यांनी केली आहे.