पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांच्या हत्येचा कट, त्यासाठी आरोपीना पळून जायला मदत करणारे चार पोलीस, नगरसेविकेचा पती ॲड. सुशील मंचरकर, माजी स्वीकृत सदस्य हमीद शेख यांच्यासह १३ आरोपींवर मोक्का अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रथमच मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
संजय काशीनाथ चंदनशीव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १० एप्रिल रोजी मोरवाडी न्यायालयाजवळून काल्या ऊर्फ राजू महादेव पात्रे, संतोष मच्छिंद्र जगताप, लुभ्या ऊर्फ संतोष चिंतामण चांदीलकर हे आरोपी पळून गेले होते.
वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी सातारा, खंडाळा येथील न्यायालयात नेले असताना तेथून परत येताना हे गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले असे सुरुवातीला दर्शविण्यात आले होते. मात्र हे गुन्हेगार पिंपरी मोरवाडी येथील न्यायालयासमोरून पळून गेल्याचे स्पष्ट झाल्याने तपासासाठी पिंपरीकडे गुन्हा वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखा तपास करत असताना फरारी गुन्हेगार सापडले.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मंचरकर याने आरोपींशी तुरुंगात ओळख झाल्यानंतर त्यांच्या सोबत माजी नगरसेवकाला मारण्यासाठी कट रचला त्यामध्ये ३० लाख रुपये व शस्त्र पुरविण्याचे ठरले. मात्र त्यांना जामिनावर तुरुंगातून काढणे वेळखाऊ असल्याने पिंपरी येथील न्यायालयातून त्यांना पळवून नेण्याचे ठरले. त्यानुसार चांदिलकर, पात्रे, जगताप यांना झेंडेच्या सहाय्याने पिंपरी न्यायालयातून पळवून लावले. पुढे झेंडे याच्याकरवी मंचरकर याने अँडव्हान्स ५ लाख रुपये आणि तीन पिस्टल व ३० जिवंत काडतुसे व इतर सामग्री दिली. मात्र पोलिसांनी झेंडे व पात्रे याला अटक केल्याने कट उधळला गेला.
पुढे गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तपासात याप्रकरणी ॲड. सुशील मंचरकर, माजी स्वीकृत सदस्य हमीद नवाब शेख, लुभ्या ऊर्फ संतोष चिंतामण चांदीलकर, सुरेश स्वामीनाथ झेंडे, राजू ऊर्फ काल्या महादेव पात्रे, सचिन जयविलास जाधव, संतोष जगताप, गणेश अहिवळे, विजय कुर्मी, गिर्या ऊर्फ विशाल गायकवाड यांच्यासह कोर्ट कंपनीचे पोलीस कर्मचारी सुभाष खाडे, विजय वाघमारे, शंकर कोकरे आणि संजय चंदनशिवे यांना अटक केली. या प्रकरणात पोलीस व आरोपी असे एकूण १७ जणांवर आधीच्या कलमांसह या प्रकरणाचा तपास करून त्यांच्यावर मोकांतर्गत कलमवाढ करण्याचा अहवाल गुन्हे शाखेने तयार करून तो वरिष्ठांकडे सादर केला. या प्रस्तावास अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे यांनी मान्यता दिली.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
























Join Our Whatsapp Group