पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६१ वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दि. २० ते दि. २४ डिसेंबर २०१७ या कालावधीत भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे येथे होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील कुस्तीपटूंसाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व नाना काटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कै. पंढरीनाथ फेंगसे यांचे स्मरणार्थ पिंपरी सौदागर पोलिस चौकी शेजारी कै. देवराम काटे पाटील क्रीडानगरीत या कुस्ती स्पर्धा रविवार दि. २६ नोव्हेंबर २०१७ होतील अशी माहिती स्पर्धा संजोयक नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे,उपाध्यक्ष काळूराम कवीतके संतोष माचुत्रे खजिनदार दिलीप बालवडकर सचिव धोंडीबा लांडगे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी पिंपळ सौदागर येथील वस्ताद पै. अर्जुन दत्तोबा काटे यांना सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच मा. दामुआण्णा काटे व पै. भरत कुंजीर यांना नाना काटे सोशल फाऊंडेशन यांचे वतीने विशेष सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ रविवार दि. २६ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर काटे, ऑलिंम्पिक वीर मारुती आडकर, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, भारत केसरी विजय गावडे, हिंद केसरी अमोल बराटे, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी दिलीप भरणे, उपमहाराष्ट्र केसरी सागर गरुड यांचे हस्ते होणार आहे.
विजेत्या मल्लांना रविवार दि. २६ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ८ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश युवक अध्यक्ष संग्राम कोते यांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी महापौर नितिन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर मांडेकर, पोलिस निरीक्षक अजय चांदखेडे आदी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेस पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या स्पर्धेचे संयोजन विठ्ठल उर्फ नाना काटे नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच यांनी केले आहे.
स्पर्धेचे नियम व अटी:-
* कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत सहभाग घेणारा हा कुस्तीगीर पिंपरी चिंचवड परिसरातील असावा.
* कुमार गटात सहभाग घेणा-या कुस्तीगीरास वयाचा दाखला आवश्यक आहे. कुस्तीगीराची जन्म तारीख दि. १/१/२००१ ते ३१/१२/२००२ या दरम्यानची असावी.
* स्पर्धा कुमार गट, खुला गट, अनुक्रमे गादी व माती गटात होतील.
* स्पर्धा संयोजक यांच्या वतीने विविध गटात प्रथम व्दितीय क्रमांक पटकाविणा-या कुस्तीगीरास मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, बक्षिस देऊन गौरविण्यात येईल.
* स्पर्धा अनुक्रमे गट ४५,४८,५१,५५,६०,६५,७१,८०,९२,११० किलो पर्यत (कुमार गट) गादी व माती खुला गट ५७,६१,६५,७०,७४,७९,८६,९२,९७,८६, ते १२५ किलो महाराष्ट्र केसरी गट
* स्पर्धा प्रारंभ रविवार दि. २६ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ९ ते ११ पर्यंत वजने घेतली जातील. दुपारच्या सत्रात ३ वाजता कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आणि सायंकाळी ८ वा. बक्षीस समारंभ होईल.