पिंपरी (Pclive7.com):- जीवनातील ताण तणाव, दूर कसे करावे आणि आनंदी कसे जगावे, हे सांगणारे, अनुभव सिद्ध लेखक आणि संमोहनतज्ञ महेश काटे यांनी लिहिलेले, ‘मंत्र जीवनाचा : एक नवा दृष्टीकोन’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन आमदार लक्षमण जगताप यांच्या हस्ते बाणेर येथे झाले.
उद्योजक नानासाहेब गायकवाड, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, माजी नगरसेवक रामधार धारिया, उद्योजक संजय भिसे, मनीष दुगड, गोविंद वाळके यावेळी उपस्थित होते. तात्या शिंगारे यांनी सूत्रसंचालन केले.
विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण कसा घालवावा, पालकांनी मुलांना घडवताना काय काळजी घावी, उत्तम व्यक्ती, समाज आणि उत्तम देश कसा घडवावा, याचे या पुस्तकामध्ये विवेचन करण्यात आले आहे.
आमदार लक्षमण जगताप म्हणाले, ‘महेश काटे हे नेहमीच वेगळा विचार करतात. संमोहन, या वेगळ्या क्षेत्रामध्ये सातत्याने काम करून, विद्यार्थी आणि समाजातील इतर घटकांसाठी उपयुक्त ठरेल, असे पुस्तक काटे यांनी उपलब्ध करून मोठे काम केले आहे.’
महेश काटे म्हणाले, ‘ताण विरहीत आयुष्य जगणे शक्य आहे. त्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. संमोहनाचा उपयोग सहाय्यकारी आणि पूरक असा होऊ शकतो. आम्ही यासाठी गेले १४ वर्षे विविध स्तरातील अनेकव्यक्तींवर, विविध प्रयोग केले असून, त्याच अनुभवावर आधारीत, हे पुस्तक आहे’.
नानासाहेब गायकवाड म्हणाले, की या पुस्तकामुळे अनेकांना जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळेल. पालकांनीही या पुस्तकाचा उपयोग करावा आणि मुलांना ताण देऊ नये.
ई-पुस्तक प्रकाशनावेळी उद्योग, व्यापार, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.