मुंबई (Pclive7.com):- सध्याच्या घडामोडी पाहिल्या तर राजकारणातील नैतिकता, विश्वासार्हता, उत्तरदायित्व या सगळ्याच गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनी जो विश्वास ठेवलेला असतो, त्या मतदारांना फसवल्यासारखं वाटतंय का? ही सर्व मनातील अस्वस्थता व्यक्त करत खासदारकीचा राजीनामा देण्याची भावना व्यक्त केली. मात्र त्यांनी महाराष्ट्रातील तरुणाईची हीच भावना असून या तरुणाईचा लोकशाही प्रणालीवर आणि लोकशाहीच्या मूल्यांवर विश्वास बसावा यासाठी काम करणं गरजेचं आहे. याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना करुन देत त्यांना राजीनामा देण्यापासून परावृत्त केले.

अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरच्या राज्यातील घडामोडी पाहून व्यथित झालेल्या खासदार डॉ. कोल्हे यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत आलो. त्यामुळे ३५० वर्ष अस्तित्वात नसलेलं स्वराज्य निर्माण केल्यानंतरही त्याला स्वतःचं राज्य न म्हणता रयतेच राज्य म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राजकारणात आलो. त्यामुळे ज्या विश्वासाने आपल्यावर जबाबदारी टाकली, त्या सर्वसामान्य मतदारांना फसवल्यासारखं वाटतंय का? ही अस्वस्थता मनात निर्माण झालेल्या खासदार डॉ. कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त करीत लेखी राजीनामा आज शरद पवार यांची भेट घेऊन सादर केला.

या संदर्भात पवार यांनी आज महाराष्ट्रातील तरुणाईच्या मनातही हीच अस्वस्थता आहे. त्यामुळे तरुणाईचा लोकशाही प्रणालीवर आणि लोकशाहीच्या मूल्यांवर विश्वास बसावा यासाठी काम करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी ५ वर्षांसाठी ही जबाबदारी दिली आहे. मतदारसंघातील अनेक महत्वाची कामे मार्गी लागली आहेत, अजूनही काही कामे मार्गी लावायची आहेत, अशी जाणीव खासदार डॉ. कोल्हे यांना करुन दिली.
या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, आज या वयात पवार साहेब तरुणांमध्ये लोकशाहीची मूल्य रुजवण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार माझ्यावर जी जबाबदारी टाकली जाईल, ती आपण पार पाडणार असल्याचे सांगून आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले.
























Join Our Whatsapp Group