भक्ती-शक्ती चौकात नागरीकांना पेढे वाटून मनसेकडून आनंदोत्सव साजरा
पिंपरी (Pclive7.com):- निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने आज (दि.२३) मान्यता दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पहिल्यापासून याबाबतची मागणी केली जात होती. आता केंद्र सरकारने मंजुरी दिल्यामुळे मनसेच्या मागणीला यश आले. म्हणूनच भक्ती-शक्ती चौकात मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यावतीने नागरीकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सचिन चिखले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरीकांना मेट्रो प्रवासाचा लाभ मिळावा, व निगडी पर्यंत मेट्रो असवी अशी सर्व शहरवासीयांची इच्छा होती. परंतु पहिला टप्पा पिंपरी ते दापोडी असा झाला. काम ही पुर्ण झाले. त्यामुळे निगडी पर्यन्त मेट्रो येईल का नाही? अशी भिती निगडी, आकुर्डी व चिंचवड मधील सर्वसामान्य नागरीकांना होती. नागरिकांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व पदाधिकारी यांनी २०१६ – २०१७ पासुन निगडी पर्यन्त मेट्रोसाठी आंदोलने मोर्चाद्वारे केंद्र व राज्य शासन यांच्या विरुद्ध आंदोलने उभी केली व लक्ष केंद्रीत केले.
मनसेच्या मागणीला आज खऱ्या अर्थाने यश आले आहे. निगडी पर्यन्त मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज केंद्र सरकारची मान्यता भेटली आहे. निगडी पर्यंतच्या मेट्रोच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाची मान्यता भेटली आहे. पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्थानके असतील. या विस्तारित मार्गासाठी होणाऱ्या खर्चात केंद्र सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समप्रमाणात वाटा असेल. हा प्रस्तावित कॉरिडॉर 4.13 किमी लांबीचा असून तो एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणून बांधला जाईल.
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अंदाजे खर्च 910.18 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आता लवकरच निगडीपर्यंतच्या मेट्रो कामाला सुरुवात होईल. वाहतूक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा मेट्रो प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. आम्ही केलेल्या मागणीला खऱ्या अर्थाने यश आले आहे. राज्यसरकार व केंद्र सरकाराचे व विविध संघटनाचे आम्ही आभारी आहोत असे सचिन चिखले यांनी म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group