पिंपरी (Pclive7.com):- जे.एस.पी.एम. संचलित ताथवडे येथील ब्लॉसम पब्लिक स्कूल मध्ये तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन एनडीएचे लेफ्टनंट कर्नल पी.एस.राणावत यांच्या हस्ते करण्यात आले. दुसऱ्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाच्या संपादिका इंदरदीप कौर नंदा उपस्थित होत्या. तर सांगता समारंभ मानव संसाधन विभाग प्रमुख मिलिंद मुतालिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी ताथवडे शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ.पी.पी.विटकर, संकुलाचे सहसंचालक डॉ. सुधीर भिलारे, प्रशासन प्रमुख रवी सावंत, नियोजन व विकास अधिकारी तसेच जेएसपीएम विद्यापीठाचे अध्यक्ष रवी जोशी, जेएसपीएम शाळेच्या सहसंचालिका अमिता कामत, प्राचार्या स्वाती आरू, उपमुख्याध्यापिका दीपा पवार व माजी विद्यार्थी अमित बाबर, वैदेही सामनेरकर, केतकी भिसे इत्यादी उपस्थित होते.
‘सृजन- द क्रिएशन’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी तीनही दिवस बहारदार कार्यक्रम सादर केले. पहिल्या दिवशी ‘पूर्व -प्राथमिक’ विभागाने आपल्या चिमुकल्यांचे कलागुण अत्यंत देखण्या पद्धतीने सादर केले. यावेळी लेफ्टनंट कर्नल पी. एस. रणावत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना देशभक्ती व सैन्याचे महत्त्व सांगितले. त्यानंतर प्राचार्या स्वाती आरू यांनी शाळेच्या कार्य अहवालाचे वाचन केले. विद्यार्थ्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गायनाने सगळ्या प्रेक्षकांना तीनही दिवस माना डोलवायला भाग पाडल्या.
बालगोपालांचे नृत्य, नाटक यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ‘प्राथमिक विभागाने’ विविध राज्यातील प्रथा, परंपरा, प्राचीन ते आधुनिक असा प्रवास, तसेच ‘गंगा नदीचे धरतीवर आगमन’ या कार्यक्रमाने तर सगळ्यांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमातून एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. गणेश वंदनेने कार्यक्रमाची बहारदार सुरुवात झाली.
‘टाकाऊतून नवनिर्मिती’ यावर आधारित ‘फॅशन शो’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची कल्पकता बघून प्रेक्षकांनी कौतुक केले. ‘अवयव दान व अक्षमता ते सक्षमता’ याद्वारे प्रेक्षकांसमोर एक नवीन विचार मांडण्यात आला. ‘माझी शाळा’ या कार्यक्रमाने तर सगळ्यांनाच आपले शाळकरी दिवस आठवले. ‘सृजन- द –क्रिएशन’ या संकल्पनेद्वारे समाजासमोर शाळेने एक नवा विचार अत्यंत समर्थपणे मांडला. उत्कृष्ठ सूत्रसंचालन आणि संकल्पनेवर आधारित रांगोळ्या हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेएसपीएम संस्थेचे संस्थापक सचिव तसेच आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, सचिव गिरिराज सावंत, विश्वस्त ऋषिराज सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ.पी.पी विटकर, प्राचार्या स्वाती आरू, शैक्षणिक संकुलाचे सहसंचालक प्रा. सुधीर भिलारे, नियोजन व विकास अधिकारी तसेच जेएसपीएम विद्यापीठाचे अध्यक्ष रवी जोशी, संस्थेचे परिसर संचालक रवी सावंत, जेएसपीएम शाळेच्या सहसंचालिका अमिता कामत यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्या दीपा पवार, सर्व विभागाचे पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या उपप्राचार्या दीपा पवार यांनी केले.