पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन द्वारे शिवजयंती निमित्त वय वर्षे ६ ते १५ या वयोगटातील मुला-मुलींसाठी “जागर शिवचरित्राचा“ ही शिवचरित्रावर आधारित विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये नृत्य, पथनाट्य, वेशभूषा स्पर्धा आणि गायन स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले.
उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयात सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी एकूण १०७ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यात ग्रुप मध्ये प्रथम क्रमांक पि के इंटरनॅशनल स्कुल ग्रुप डान्सने पटकावला. तर सोलो गटामध्ये प्रथम क्रमांक – अदिती काटे, द्वितीय – प्रज्ञा शिंदे, तृतीय -आराध्या, चतुर्थ – इशिता भगत, पाचवे – शाल्वी, सहावे – प्रगती शिंदे, सातवे – आर्यन बोबडे पारितोषिक यांनी पटकावले.
या अनोख्या स्पर्धेमागील संकल्पना विषद करताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी अल्पवयीन असताना, संवगाड्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. नव्या पिढीला आपल्या वैभवशाली वारश्यांची ओळख करून देण्याची आवश्यकता आहे. तरच पुढील काळात नागरिकांची शिवविचारांनी बहरलेली एक सुजाण पिढी घडणार आहे.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप अभियंता सेलचे प्रमुख सागर बिरारी यांनी केले. याप्रसंगी राजू शेलार, विवेक तितरमारे, वाल्मिक काटे, विकास काटे, सहसंपर्क प्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश मनोज ब्राह्मणकर, विठ्ठल नांगरे, रवींद्र पाटील, विठाई वाचनालयाचे रमेश वाणी, दिलीप चौघुले, पि के स्कुलच्या प्राचार्य धनश्री सोनवणे, रश्मी मोरे, पालकवर्ग आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.