पिंपरी (Pclive7.com):- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. शरद पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी कंबर कसल्याने अजित पवार यांना बारामतीनंतर शिरूरमध्ये ही चीत पट करण्यासाठी शरद पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा सुरू असताना भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपण शिरूर लोकसभेच्या मैदानात उतरण्यास इच्छुक असल्याचे सांगत त्यांनी दंड थोपटले आहेत.
विलास लांडे यांनी म्हटले आहे की, शिरूरची आगामी लोकसभा लढण्यास मी इच्छुक आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे. गेली अनेक वर्षे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम केलं असून अजित पवार यांच्यासोबत एकनिष्ठ आहे. शिरूर लोकसभेत कामाचा अभाव आहे. मी शंभर टक्के निवडून येणार असा विश्वास विलास लांडे यांनी व्यक्त केला आहे.
विलास लांडे हे भोसरी विधानसभेचे माजी आमदार आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या ते अत्यंत जवळचे असल्याचं मानलं जातं. २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत विलास लांडे यांची निश्चित झालेली उमेदवारी ऐनवेळी अमोल कोल्हे यांना देण्यात आली होती. त्यामुळे आगामी शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे हे तीव्र इच्छुक असून २०१९ ला हुकलेली संधी त्यांना पुन्हा मिळवायची आहे. आता महायुतीत शिरूरची जागा राष्ट्रवादीला सुटणार का? आणि अजित पवार लांडे यांना उमेदवारी देणार का? हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.