पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात शेकडो सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर भाजपचे चिन्ह कायमस्वरूपी रंगविण्यात आले असून ते तात्काळ मिटविण्यात यावे, तसेच संबंधित दोषींवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यावतीने शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “देशभरात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून आदर्श आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर शहरात महानगरपालिका प्रशासनाकडून राजकीय पक्ष चिन्ह नावे इत्यादी झाकण्याचे तसेच राजकीय जाहिरात होर्डिंग फ्लेक्स काढण्याचे काम करण्यात येत आहे.
आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाकडून शहरभरात शेकडो सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर पक्षाचे चिन्ह कायमस्वरूपी रंगविण्यात आल्याचे पाहायला मिळते. त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे थेटपणे उल्लंघन होत आहे.
तरी आमची आपणांस नम्र विनंती आहे की, शहरात ज्या ज्या ठिकाणी असे पक्ष चिन्ह व नाव रंगविण्यात आले आहे ते महापालिका प्रशासन तथा निवडणूक विभागाकडून तात्काळ मिटविण्यात यावे, शिवाय आचारसंहिता भंगाच्या घटना घडणार नाहीत याकडे कुठल्याही राजकीय पक्षाचा अभिनिवेश किंवा दबाव न बाळगता कारवाई करावी” अशी मागणी करण्यात आली आहे.