पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, शिरुरमधील प्रचार शिगेला पोहोचला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन्ही पक्षाचे उमेदवार यांनी तळ ठोकला आहे. असे असले तरी, भोसरीतील भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे आढळराव पाटलांच्या प्रचार जाहिरातीतून ‘गायब’ आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत. त्यांच्या विरोधा महाविकास आघाडीकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे निवडणूक लढवत आहेत. आढळराव घड्याळ चिन्हावर, तर कोल्हे तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहे.
२०१९ मध्ये भोसरी विधानसभा मतदार संघातील मतांच्या आकडेवारीमध्ये डॉ. कोल्हे पिछाडीवर होते. त्यामुळे यावेळी कोल्हे यांनी भोसरीत लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच, आढळराव पाटील यांनीही भोसरीत प्रचाराला जोर दिला असून, मताधिक्य कायम ठेवण्यासाठी जोर लावला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे आणि भाजपाचे आमदार महेश लांडगे दोघांनीही प्रचार दौरा जाहीरातीतून वगळण्यात आले आहे.
भोसरीतील प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अधिकृत फेसबूक पेजवरून प्रचार दौरा जाहिरात डिझाईन पोस्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये लांडे आणि लांडगे या दोन्ही नेत्यांचा फोटो आणि उल्लेख दिसत नाही.
राष्ट्रवादी अजित पवार गटातील स्थानिक पदाधिकारी भाजपाशी जुळवून घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे आजी-माजी आमदार यांना आढळराव पाटील यांनी बगल दिली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, शनिवारी आढळराव पाटील यांनी भोसरी प्रचार दौरा केला. त्यावेळी माजी आमदार विलास लांडे आणि आमदार महेश लांडगे दोघेही अनुपस्थित होते. तसेच, विलास लांडे लोकसभा उमेदवारीसाठी आग्रही होते. पण, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे लांडे नाराज असून, राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सूत जुळत नसल्यामुळे महेश लांडगे अलिप्त आहेत, अशी चर्चा आहे.























Join Our Whatsapp Group