वाकड (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या पुढाकारातून वाकड परिसरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाकड परिसरात ठिकठिकाणी महिलांना या योजनेच्या अर्जांचे वाटप करून अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन राम वाकडकर यांनी केले आहे.

राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या वतीने वाकड परिसरात मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला आहे. १) रामभाऊ वाकडकर जनसंपर्क कार्यालय माऊली चौक वाकड, २) पाण्याच्या टाकीजवळ काळाखडक, ३) मनपा शाळेजवळ भुमकरवस्ती वाकड या ठिकाणी या अर्ज भरून घेण्याची व्यवस्था राम वाकडकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

राम वाकडकर म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्यातील महिलांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवीत आहे. आता महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. वाकड परिसरातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. त्याची सुरूवात करण्यात आली आहे. महिन्याला १५०० रुपये मदत देण्याच्या या योजनेतून परिसरातील एकही महिला लाभार्थी वंचित राहू नये यासाठी मी प्रयत्नशील आहे. या योजनेकरिता आमच्या संपर्क कार्यालयात अर्ज मोफत भरून घेऊन ते शासनापर्यंत पोहचविले जातील. तरी जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राम वाकडकर यांनी केले आहे.

























Join Our Whatsapp Group