‘महायुती’ सरकारच्या योजनेला महिलांचा वाढता प्रतिसाद; महापालिकासह सर्व शासकीय विभागांची शहरात लगबग
पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना घोषित केली. या योजनेला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये तब्बल ५० हजाराहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये ‘‘वचनपूर्ती’’ सोहळा संपन्न झाला. त्यापूर्वीच, लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत.
आतापर्यंत राज्यात १ कोटी ८ लाख महिलांना या योजनेचा लाभ झाला असून, १ कोटी ३५ लाख महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. महिलांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील महिलांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या महिनाभरामध्ये तब्बल १ लाख ६० हजाराहून अधिक महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत. दि. १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत शहरातून १ लाख ५० हजार ७३५ इतके अर्ज पात्र ठरले आहेत. या लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा झाल्यामुळे महिला वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
‘शेवटच्या घटकाचा विकास’ अर्थात अंत्योदय हा भारतीय जनता पार्टी व महायुतीचा अजेंडा आहे. राज्यातील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ घोषीत केली. त्यावेळी यावर टिका झाली. पण, आजच्या घडीला राज्यात सुमारे १ कोटी ३५ लाख आणि शहरात १ लाख ५० हजाराहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. भोसरी विधानसभा क्षेत्रामध्ये हा आकडा ५० हजाराहून अधिक आहे. राज्यात महिला भगिनींसाठी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’च्या माध्यमातून वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेची सेवा हेच शासनाचे ध्येय असून, प्रत्येक योजना यादृष्टीनेच गतीने राबविण्यात येत आहे, ही बाब निश्चित स्वागतार्ह आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

























Join Our Whatsapp Group