पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात आमदारांच्या वाहनावर लावण्यात येणारे ‘विधानसभा सदस्य’ हे स्टीकर शहरातील कित्येकजणाच्या वाहनावर अवैधरित्या दिसून येत आहेत. आता महापौर नितीन काळजे यांचे नाव दुचाकीच्या नंबरपेल्टवर टाकले जात असल्याचे आज समोर आले आहे. नंबर प्लेटवर महापौर नितीन काळजे यांचे नाव टाकलेल्या दुचाकीवरुन जाणारे तरुण ‘कॅमे-यात’ कैद झाले आहेत. एमएच १२ एम.जी.५९९ असा या दुचाकीचा नंबर असून सोशल मिडीयावर हा फोटो व्हायरल झाला असून शहरात मोठा चर्चेचा विषय ठरलाय.
पदाधिकारी नसताना खासगी वाहनांवर अशी नावे टाकणे गुन्हा आहे. परंतु, शहरात अनेक वाहनांवर ‘विधानसभा सदस्य’ हे स्टीकर लावून फिरताना दिसतात. अगदी अल्टोपासून फॉर्च्युनरसारख्या वाहनांवर हे स्टीकर दिसून येत असून औद्योगिकनगरीतील तिनही विधानसभा मतदार संघात अशा ‘डमी’ आमदारांची संख्या अधिक आहे. त्यातच आता महापौर नितीन काळजे यांचे नाव, महापौर असे दुचाकीच्या नंबरप्लेटवर टाकले जात आहे. नंबर प्लेटवर महापौर नितीन काळजे यांचे नाव टाकलेल्या दुचाकीवरुन जाणारे तरुण ‘कॅमे-यात’ कैद झाले आहेत.
याप्रकरणी महापौर नितीन काळजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, त्या दुचाकीचा आणि माझा काही संबंध नाही. पोलीसांनी त्या दुचाकी चालकावर कारवाई केली तरी चालेल. कुणी जर माझ्या परस्पर माझे नाव आपल्या गाडीवर लावत असेल तर चुकीचेच आहे. दरम्यान आता या दुचाकीवर पोलीस काय कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





















Join Our Whatsapp Group