पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातून विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात हकालपट्टी (डिपोर्ट) करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारने कारवाई करत त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांचे बांगलादेशी नागरिकत्व सिद्ध झाले. त्यानंतर २२ जुलै रोजी विशेष विमानाद्वारे त्यांना बांगलादेशात पाठविण्यात आले.

गुन्हे शाखा युनिट चारला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, डिपोर्ट करण्यात आलेले सहा जण वाकड येथील भुजबळ चौकातून मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी संशयावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी भारतीय असल्याचा बनाव केला. मात्र त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचे अधिकृत कागदपत्रे नसून बांगलादेशी असल्याचे स्पष्ट पुरावे आढळून आले. दरम्यान, कायदेशीर प्रक्रियाद्वारे त्यांना डिपोर्ट करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड पोलिसांची प्रथमच डिपोर्टची कारवाई
भारतामध्ये बेकायदा वास्तव्यास असलेल्या रोहिंग्या व बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने थेट डिपोर्टिंगचा आदेश जारी केला आहे. यापूर्वी अशा नागरिकांविरोधात गुन्हे दाखल करून न्यायालयात हजर करण्यात येत होते. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांना जामीन मिळत होता. त्यानंतर अशा घुसखोरांवर लक्ष ठेवणे पोलिस व अन्य यंत्रणांसाठी आव्हान बनत होते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये थेट हद्दपारी करण्याची भूमिका घेण्यात आली असून त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही प्रथमच डिपोर्टची कारवाई केली.

आयुक्तालयातील पहिलीच कारवाई
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट २०१८ रोजी झाली. त्यानंतर प्रथमच अशा स्वरूपाची थेट हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या सहा नागरिकांना प्रथम पुणे विमानतळावरून गुवाहाटी येथे नेण्यात आले. त्यानंतर बीएसएफच्या (सीमा सुरक्षा दल) ताब्यात देत २२ जुलै रोजी विशेष विमानाद्वारे बांगलादेशात पाठवण्यात आले.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, विशेष शाखेचे वरिष्ठ निरीक्षक नितीन लांडगे, पोलिस निरीक्षक विकास राऊत, सहायक निरीक्षक राजश्री पावरा, उपनिरीक्षक भरत माने, मयुरेश साळुंखे, सहायक उपनिरीक्षक संजय गवारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


























Join Our Whatsapp Group