पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार पक्षप्रवेशांची लाट सुरू असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आकुर्डी, काळभोरनगर प्रभागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

हा प्रवेश शहरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करणारा ठरला आहे. प्रभागात प्रभावशाली मानले जाणारे प्रमोद कुटे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवरील पकड अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.
या पक्षप्रवेशाच्या वेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, प्रचार प्रमुख नाना काटे, अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, वैशाली काळभोर, जगदीश शेट्टी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी प्रमोद कुटे यांचे पक्षात स्वागत करत आगामी महापालिका निवडणुकीत एकत्रित ताकदीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

महापालिका रणसंग्रामाच्या तोंडावर शिवसेनेतील नगरसेवकाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, येत्या काळात आणखी काही महत्त्वाचे पदाधिकारी राष्ट्रवादीच्या गोटात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.























Join Our Whatsapp Group