भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचा प्रभाव राष्ट्रवादीला रोखता येईना ?
महापालिका निवडणुकीच्या पहिल्या चरणात राष्ट्रवादी ‘बॅकफूट’वर
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महापालिकेत सत्ता आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मात्र, जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून पिंपरी आणि चिंचवड मतदार संघात जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. पण, भोसरी विधानसभेतील नियोजित कार्यक्रम झालाच नाही. विशेष म्हणजे, आचार संहिता सुरू झाल्यामुळे आता सदरचा कार्यक्रम होणारच नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरीतील जनसंवाद कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना भाजपा आमदार महेश लांडगे यांचा प्रभाव रोखता येईना, असे निरीक्षण राजकीय जाणकरांनी नोंदवले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्रपणे निवडणूक लढणार, अशी घोषणा केली. आज अजित पवार यांनीही याला दुजोरा दिला आणि पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपाचे नेते आणि आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय सत्तासंघर्ष असल्याचे चित्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आणखी गडद झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे दादा विरुद्ध भाजपाचे दादा असा सामना स्थानिक पातळीवर रंगणार, अशी चर्चा होती. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने आयोजित केलेला ‘‘जनसंवाद’’ कार्यक्रम पिंपरी आणि चिंचवड मतदार संघात झाला. पण, भोसरीत झाला नाही, परिणामी स्थानिक नेत्यांना भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करता आली नाही. महापालिका निवडणुकीची सुरूवात झाली असून, पहिल्या टप्प्यात ‘‘माहोल’’ करण्यात राष्ट्रवादी ‘बॅकफूट’वर पहायला मिळत आहे.

पिंपरी-चिंचवडचा दादा हवा की, बारामतीचा दादा?
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाला स्थानिक- भूमिपूत्र आणि गाववाले- नाती-गोती असा किनार आहे. गत निवडणुकीत भाजपाने ‘‘नको बारामती… नको भानामती, पिंपरी-चिंचवडची धुरा देवू राम-लक्ष्मणाच्या हाती’’ अशी घोषणा दिली होती. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर शहराचे नेतृत्व स्थानिक पातळीवर आमदार महेश लांडगे प्रभावीपणे करीत आहेत. त्यामुळे चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक, त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यानंतर उत्तर पुणे जिल्ह्याची जबाबदारीही आमदार लांडगे यांनी यशस्वी केली. महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक उमेदवार आणि नेते गावकी-भावकीचा विचार करुन पिंपरी-चिंचवडच्या दादाच्या मागे उभा राहणार की, गेल्या 30 वर्षांपासून कायम सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेलेल्या बारामतीच्या दादाच्या मागे राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महेश लांडगे यांची घोडदौड रोखण्याचे आव्हान…
2017 मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भोसरी मतदार संघातील 48 पैकी 33 जागा भाजपाच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. महापालिकेतील भाजपा सत्तेतील ‘‘किंगमेकर’’ म्हणून आमदार महेश लांडगे यांनी जोरदार बँटिंग केली. भाजपा सत्ताकाळात दोन महापौर, दोन स्थायी समिती सभापती, क्रीडा समिती, शिक्षण समिती आणि क्रीडा समिती सारख्या महत्त्वाच्या पदांवर आपल्या समर्थकांची नियुक्ती केली. त्यामुळे आमदार लांडगे यांच्यापाठीशी स्थानिक पातळीवर मोठी ताकद तयार झाली. तसेच, 2019 ची विधानसभा आणि 2024 ची विधानसा या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीने अनेक प्रयोग करुनही महेश लांडगे यांची घोडदौड रोखता आली नाही. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्थानिक पातळीवर ‘‘डिफेन्डन्सी’’ असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल आव्हानात्मक होणार आहे.























Join Our Whatsapp Group