मावळ (Pclive7.com):- मावळ तालुक्यातील उर्से गावात पाच वर्षीय चिमुकल्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना संपूर्ण तालुक्याला हादरवणारी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर मावळ तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसैनिक आणि शिंदे शिवसेना गटाच्या उपनेत्या सुलभा उबाळे यांनी आज शिरगाव–पुरंदवडी पोलीस स्टेशन येथे भेट देत पोलीस अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा मिळावी, तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

यासोबतच मावळ तालुक्यातील औद्योगिक परिसरात उर्से बेबडोहोळ यांसारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग कार्यरत असून, येथे कामासाठी मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार येत असतात. त्यामुळे या कामगारांची कसून चौकशी करण्यात यावी, तसेच भाडेकरू, घरमालक आणि कामगारांची नियमित तपासणी पोलिसांकडून करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

अशा अमानुष घटनांमुळे मावळ तालुक्याची बदनामी होत असून, यापुढे पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्यास शिवसेनेच्या वतीने ‘शिवसेना स्टाईल’ तीव्र आंदोलन व पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात येईल, असा इशाराही सुलभा उबाळे यांनी दिला आहे.


























Join Our Whatsapp Group