पिंपरी (Pclive7.com):- त्रिवेणीनगर- तळवडे प्रभाग क्र.१२ मध्ये भारतीय जनता पक्षाची आक्रमक भूमिका गेम चेंजर ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा “फेक नरेटिव्ह प्लान“ फेल करत प्रभाग क्र.१२ मधून प्रभाग क्र.१ व ११ मध्ये स्थलांतरित झालेली मतदारांची नावे पुन्हा प्रभाग क्र.१२ मध्ये समाविष्ट करण्यात आली असल्याची माहिती माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांनी दिली आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील त्रुटी आणि मतदारांच्या स्थलांतराचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. प्रभाग क्र.१२ (त्रिवेणीनगर, तळवडे) मधील मतदार यादी भाग क्रमांक ७ सह अनेक मतदारांची नावे चुकीने प्रभाग क्र.१ आणि ११ मध्ये स्थलांतरित झाली होती. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन, ही स्थलांतरित नावे पुन्हा मूळ प्रभाग १२ मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी मोठी मोहीम शांताराम बाप्पू भालेकर, शितल धनंजय वर्णेकर व अस्मिता अनिल भालेकर यांनी मतदारांच्या घरोघरी जावुन यशस्वीरित्या राबवली.

यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या घरी जाऊन हरकतीचे फॉर्म भरून घेतले, तसेच ठिकठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन केले. ही संपूर्ण बाब भाजपच्या शिष्टमंडळाने थेट निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आणि ‘फ’ प्रभाग कार्यालयाचे प्रमुख अधिकारी अतुल पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. या महत्त्वपूर्ण विषयावर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती पक्षाकडून करण्यात आली होती.

निवडणूक आयोगाने नेमलेले बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) तसेच मतदारांची ओळख पटवून ते त्याच प्रभागातील रहिवासी आहेत का, याची खात्री करण्यासाठी नेमलेल्या प्रतिनिधींना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली. मतदार आणि अधिकारी यांच्यात समन्वय साधून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. भाजपच्या या सक्रिय सहभागामुळे अखेर निवडणूक आयोगाने स्थलांतरित झालेली ही सर्व नावे पुन्हा प्रभाग क्रमांक १२ च्या मतदार यादीत समाविष्ट केली आहेत. मतदारांना त्यांच्याच प्रभागात मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याने, भाजपच्या या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

























Join Our Whatsapp Group