पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता कार्यक्रम जाहीर होण्याअगोदर आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डिकर यांनी स्थायी सभेची बैठक घेतली. आयुक्तांनी सोमवारी (दि.१५) सकाळी दहा वाजता ऑनलाईन बैठकीला उपस्थिती दाखवत दीडशेहून अधिक प्रस्ताव मंजूर करत सुमारे २५० कोटी खर्चाच्या कामांना मान्यता दिली. यामध्ये वर्षानुवर्ष रखडलेल्या काही वादग्रस्त निविदा प्रक्रियेचा निकाल लावत करोडोंच्या तरतूद वर्गीकरणाच्या प्रस्तावांचाही समावेश आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीची घोषणा केली. तत्पूर्वी प्रशासक श्रावण हर्डीकर ऑनलाईन पद्धतीने बैठक घेत सर्वसाधारण सभा व स्थायी समितीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. शेखर सिंह यांच्या बदलीनंतर हर्डीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार आहे. त्यातच निवडणूक होत आहे. या आचारसंहितेपूर्वी त्यांनी हे निर्णय घेतले. आचारसंहितेच्या धास्तीमुळे महापालिका मुख्यालयात आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव, शहर अभियंता व इतर काही अधिका-यांच्या दालनात ठेकेदार व सल्लागारांचा राबता होता. कामांचे प्रस्ताव मंजूर करणे आणि काही कामाचे आदेश काढून घेण्यात आले.

सुरक्षेच्या १५४ कोटींची निविदा
महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागातील रखवालदार पुरविण्याची 154 कोटींची वादग्रस्त मोठी निविदा, ह क्षेत्रीय कार्यालयाची इमारत बांधण्याची 43 कोटींची निविदा, विविध भागातील ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 20 कोटींची कामे मंजूर करण्यात आली. यासह हेल्थकार्ड देखभाल दुरुस्ती करणे, निवडणूक विषयक कामे, रस्ते दुरुस्ती, खेळाचे मैदान, इमारती बांधणे, महापालिका शाळा, दवाखाना यांची देखभाल-दुरुस्ती अशा विविध प्रकारच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.
























Join Our Whatsapp Group