पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना महापालिकेकडून आवश्यक असलेला ना हरकत दाखला सुलभरीत्या मिळावा, यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर विशेष ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेमुळे इच्छुक उमेदवारांना आता घरबसल्या ना हरकत दाखल्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज सादर करताना उमेदवारांना ओळखपत्र म्हणून आधार कार्ड क्रमांक आणि आवश्यक वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. या प्रणालीमुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सोप्या पद्धतीने पार पाडता येणार आहे. अर्ज प्रक्रिया समजून घेण्यासाठी उमेदवारांना मदत व्हावी, यासाठी संकेतस्थळावर क्रमाक्रमाने अर्ज कसा करावा याबाबतचा माहितीपूर्ण व्हिडीओ देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

याशिवाय महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी, मतदार यादीतील संभाव्य दुबार नावे, आरक्षण सोडत माहिती, अंतिम प्रभाग रचना तसेच प्रारूप प्रभाग रचना यासंबंधीची सविस्तर माहिती देखील नागरिक आणि उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ना हरकत प्रमाणपत्रासाठी असा करा अर्ज..
• अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
• सदर संकेतस्थळावर ‘मनपा सार्वत्रिक निवडणूक’ या पर्यायावर क्लिक करावे.
-त्यानंतर ‘उमेदवारांसाठी ना हरकत दाखला प्रणाली’ या पर्यायामधून ऑनलाईन अर्ज सादर करावा.
























Join Our Whatsapp Group