

आकुर्डी येथील खाद्यपदार्थ केंद्रातील गाळ्यांचा ई-लिलाव पूर्ण; ९७ महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना अंतर्गत मौजे आकुर्डी येथील खाद्यपदार्थ केंद्रातील गाळे महिला बचत गटांना भाडेकराराने देण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी ई-लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. या लिलावात तब्बल ९७ महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला.

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मे. रिलायन्स ऑकशन चे प्रतिनिधी इब्राहीम खान यांच्या सहकार्याने एकूण ४९ गाळे ई-लिलावासाठी उपलब्ध करून देण्यात आले. त्यात दिव्यांग महिला बचत गटांसाठी २, तृतीयपंथी गटासाठी १, कोविड योद्धा महिला बचत गटासाठी १, आदिवासी महिला बचत गटासाठी २, DAY-NULM अंतर्गत ३, तर पीसीएमसी सक्षमा अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटांसाठी तब्बल ४० गाळ्यांचे आरक्षण करण्यात आले.

या ई-लिलावात १५,१०० रुपये ते ३२,००० रुपये या दरम्यान बोली लावली गेली. विशेष म्हणजे, महिला बचत गटांना गाळे वाटप करण्यासाठी आयोजित केलेला हा देशातील पहिलाच ई-लिलाव ठरला आहे.

गाळे प्रथम तीन वर्षांसाठी भाड्याने देण्यात येणार असून कामकाज समाधानकारक असल्यास पुढील दोन वर्षांची मुदतवाढ मिळेल. भाडे व देखभाल शुल्काचा भरणा संबंधित गटानेच करायचा आहे. विलंब झाल्यास दंड आकारला जाईल. गाळ्यांचा वापर केवळ नोंदणीकृत बचत गटांनाच करता येणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागामार्फत महिलांना उपजीविका निर्मितीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आकुर्डी फूड कोर्टाद्वारे आपण ही सुरूवात केली आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी देणे आणि समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हा आमचा उद्देश आहे. गाळ्यांचे वाटप पारदर्शक पद्धतीने ई-लिलावाद्वारे करण्यात आल्यामुळे प्रत्येक गटाला समान संधी मिळाली आहे. या उपक्रमामुळे महिला बचत गटांच्या कार्याला प्रोत्साहन मिळून त्यांची आत्मनिर्भरता वाढेल आणि पिंपरी चिंचवडमध्ये उद्योजक महिलांची नवी पिढी घडेल.”— ममता शिंदे, उप आयुक्त, समाज विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
