पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन एकीकडे शहरातील आठ प्रभागात बेकायदेशीर जाहिरात बोर्ड व फ्लेक्स विरोधात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कारवाई राबवत आहे, तर दुसरीकडे स्वतःच्याच कार्यालयात बेकायदेशीर जाहिराती लावल्या गेल्याने प्रशासनाची दुहेरी भूमिका उघड झाली आहे. निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या आतच महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी अनधिकृत जाहिरात फ्लेक्स लावल्याची माहिती समोर आली असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.

पालकमंत्री अजित पवार यांची तंबी, तरीही बेफिकीर प्रशासन..
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतेच शहरातील बेकायदेशीर जाहिरात बोर्ड व फ्लेक्स विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी प्रशासनाला अशा अनधिकृत जाहिरातींवर कठोर कारवाई करण्याची स्पष्ट तंबी दिली होती. त्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार शहरातील आठ प्रभागांमध्ये महापालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली होती.
या मोहिमेदरम्यान शिवमुद्रा प्रतिष्ठान, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलकांवर देखील कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले होते. मात्र, काही दिवसांतच स्वतःच्या कार्यालयात नियमभंग होत असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात बेकायदेशीर फ्लेक्स; अधिकाऱ्यांचे मौन
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच-सहा दिवसांपासून निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातच कर्मचाऱ्यांनी जाहिरात फ्लेक्स लावले आहेत. हे फ्लेक्स पूर्णपणे अनधिकृत असून, त्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही. नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी याबाबत वारंवार लक्ष वेधूनही ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी पाटील यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या अनधिकृत फ्लेक्समुळे कार्यालय परिसरात बकालपणा निर्माण झाला असून, स्वच्छता आणि शिस्त राखण्याच्या प्रशासनाच्या दाव्यांवर पाणी फिरले आहे.
“स्वतःचे नियम पाळा” – भाजप कार्यकर्त्यांची टीका
या पार्श्वभूमीवर भाजपचे पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “महापालिका प्रशासन शहरात बेकायदेशीर जाहिरात फ्लेक्स काढत आहे, पण स्वतःच्याच कार्यालयात नियमभंग करते, हे दुहेरी धोरण आहे. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात लावलेले फ्लेक्स तात्काळ काढण्यात यावेत आणि संबंधितांवर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
कारवाईची अपेक्षा..
शहरातील नागरिकांमध्येही या घटनेमुळे नाराजी पसरली आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांवर कारवाई करताना जसा कठोरपणा दाखवला, तसाच कठोरपणा स्वतःच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध दाखवावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. अखेर, नियम सर्वांसाठी सारखे असावेत, मग ते सामान्य नागरिक असोत की महानगरपालिकेचे अधिकारी, अशीच भावना शहरात व्यक्त होत आहे.