
पिंपरी (Pclive7.com):- मुंबई-पुणे महामार्गावर निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली PMPML च्या इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागली. त्यावेळी बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी किंवा जखमी झाले नाही. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनीही आग विझवली तोपर्यंत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस निरीक्षक बनसोडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्याचप्रमाणे अग्निशामक दल त्वरीत घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार दुरुस्तीअभावी तांत्रिक यंत्रणा बिघडल्यामुळे आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

ही बस खाजगी ठेकेदारामार्फत भाडेतत्त्वावर चालवली जात होती, आणि संबंधित ठेकेदाराचा काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचाही आरोप स्थानिकांनी केला आहे. बसची योग्य ती दुरुस्ती न झाल्याच्या यापूर्वी देखील प्रवाशांनी तक्रारी केल्या होत्या.
स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या घटनेची चौकशी करत आहेत. दरम्यान, प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याबद्दल अग्निशामक विभागाचे कौतुक होत आहे.