पिंपरी (Pclive7.com):- प्रतिस्पर्धी टोळीतील राकेश भरणेचा साथीदार पिंट्या उर्फ किरण सूर्यवंशीचे अपहरण करुन त्याचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या बाळू वाघेरेसह सातजणांची हायकोर्टाने बुधवारी (४ जुलै) निर्दोष मुक्तता केली. सप्टेंबर २००७ साली झालेल्या या अपहरण व खून प्रकरणात जानेवारी २०१३ साली तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
बाळू बबनराव वाघेरे (रा. पिंपरी), दिलीप नामदेव भरणे (रा. माण, मुळशी), जयनाथ सुरेश फडतरे (कसबापेठ), सतीश श्रीरंग जाधव (रा. उरळीकांचन), बबन प्रकाश रणवरे ( रा. बाणेरगाव), संजय गोपाळ शिंदे (रा. पिंपरी), सुधीर सोपान क्षीरसागर (रा. कसबा पेठ) अशी सुटका झालेल्यांची नावे आहेत. सूर्यवंशी याचा मित्र प्रशांत भीमराव गायकवाड (रा. खडकी) याने याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पिंपरी चिंचवड परिसरात भरणे-वाघेरे या टोळ्यांमध्ये नेहमी टोळी युद्धधुमसत होते. कुख्यात गुंड अंकुश सुर्वेच्या खूनातील आरोपी राकेश भरणे याला न्यायालयीन कामासाठी किरण मदत करत असल्याच्या रागातून त्याचे अपहरण करून खून करण्यात आला होता. मुळशी येथे डोक्यात बिअरची बाटली आणि गोळी मारून त्याचा खून करण्यात आला होता.
प्रशांत याने दिलेल्या फिर्यादीत दिलीप भरणे याने वाघेरेला खुनाची सुपारी दिली होती. त्यानंतर आठ जणांनी मिळून हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. सात जणांना पोलिसांनी अटक केल्यावर आठवा आरोपी पसार झाला होता. त्याला पोलिसांनी बऱ्याच काळानंतर अटक केली होती. त्याने हायकोर्टात याबाबत स्वतंत्र याचिका दाखल केली आहे.
२९ सप्टेंबर २००७ रोजी रात्री नऊ वाजता किरण व प्रशांत हे आंबेडकर चौक येथे थांबले होते. तेव्हा आरोपींनी मोबाइल वरून तो कोठे आहे याची खात्रीकरून किरण आणि प्रशांतला चारचाकी गाडीमध्ये घेतले. किरणने त्याच्या दुसऱ्या मित्राला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतानाच पाठीमागून वाघिरेने पिस्तुललावून त्याचा मोबाइल काढून घेतला.
त्याला इतर आरोपींनी मारहाण केली. आरोपींनी चारचाकी औंध रोडने पाषाण येथे नेली. आरोपींनी चांदणी चौक कोथरूडयेथून वाईन शॉपीतून सहा बिअरच्या बाटल्या विकत घेतल्या. ते सर्वजण कात्रजबायपास हायवेने भोरच्या दिशेने गेले. त्यातील एकाने किरणच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. वाघेरेने त्याच्या पोटामध्ये गोळ्या घातल्या.
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास वडगाव हद्दीत किरणला जीपच्या बाहेर घेऊन आरोपींनी त्याच्या डोक्यात मध्यभागी पिस्तुल लावून गोळी झाडली. तो मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याचे प्रेत रस्त्यालगत टाकून दिले. या केसमध्ये तीन साक्षीदार फितूर झाले.
प्रशांतच्या खुनाचा होता कट ?
या केसच्या सुनावणी दरम्यान फिर्यादी प्रशांतला मारून टाकण्याचा कट वाघेरे टोळीने रचल्याचे सांगितले गेले. याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत समजली होती. तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी याची गंभीर दखल घेऊन प्रशांत याला पोलिस संरक्षण दिले होते. यासाठी त्यांनी जिल्हा न्यायधीश अनंत बदर यांची देखील भेट घेतली होती.





















Join Our Whatsapp Group