पिंपरी (Pclive7.com):- पर्यावरण संवर्धन, हवामान बदल नियंत्रण आणि हरित जीवनशैलीचा प्रसार या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या “माझी वसुंधरा” या उपक्रमात ‘हरित प्रतिज्ञा’ घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांमध्ये वसुंधरा संवर्धन, हरित सवयी आणि जबाबदार नागरी सहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच माझी वसुंधरा अभियानामध्ये जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून विशेष कार्ययोजना आखण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालये, उद्योगसंस्था, महिला बचत गट, रहिवासी संघटना आणि सामाजिक संस्था यांनाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जात असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या मोहिमेचा भाग म्हणून शहरातील नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने ‘हरित प्रतिज्ञा’ घेऊन पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प करून आपल्या कृतीतून निसर्गसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच या अभियानांतर्गत नागरिकांनी झाड लावताना, वृक्षारोपण करताना किंवा हरित उपक्रमात सहभागी होताना एक फोटो घेऊन तो सोशल मीडियावर अपलोड करावा आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसना टॅग करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
अशी घ्या प्रतिज्ञा..
- सर्वप्रथम https://majhivasundhara.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- मराठी / इंग्रजी यापैकी मराठी भाषा निवडा.
- तुमच्या स्क्रीनवर दिसणारा ‘हरित शपथ’ हा पर्याय क्लिक करा.
- त्यानंतर ‘त्वरित तुमची ई-प्लेज घ्या’ या पर्यायावर क्लिक करा.
- ‘पुढे जा’या पर्यायावर क्लिक करा.
- ‘वैयक्तिक / सामूहिक’यापैकी एक पर्याय निवडून ‘सादर करा’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रीनवर दिसणारा प्रतिज्ञा अर्ज भरून ‘सादर करा’ या पर्यायावर क्लिक करा.
पिंपरी चिंचवड शहराने ‘हरित जीवनशैली’ अंगीकारण्यासाठी पुढाकार घेतला असून ‘माझी वसुंधरा ६.०’ अभियानामुळे नागरिकांना पर्यावरणपूरक विचार आणि कृतींचे प्रात्यक्षिक देण्याची उत्तम संधी मिळते. महापालिका प्रशासन, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरिक सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास पिंपरी चिंचवड शहर राज्यातील आदर्श, सुंदर, हरित शहर ठरू शकेल.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
माझी वसुंधरा ही केवळ एक हरित मोहीम नसून, ती प्रत्येक नागरिकाची पर्यावरणाशी असलेली बांधिलकी आहे. प्रत्येकाने एक झाड लावून त्याची निगा राखली, प्लास्टिकचा वापर कमी केला आणि पाणी व उर्जेची बचत केली, तर आपण सर्व मिळून हरित व प्रदूषणमुक्त शहर घडवू शकतो. भविष्यातील पिढ्यांसाठी हीच खरी भेट ठरेल.
– डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
























Join Our Whatsapp Group