पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेतील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) तसेच, खुल्या (ओपन) गटातील या सर्व राखीव जागांवर महिलांसाठी असलेल्या जागेसाठी आरक्षण सोडत मंगळवार दि.११ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणूक विभागाला दिले आहेत. त्यामुळे कोणत्या प्रभागात महिला आरक्षण पडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे मंगळवार दि.११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार निवडणूक विभागाकडून याबाबतची सर्व तयारी झाली असून आता या सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या ४ सदस्यीय ३२ प्रभागांची रचना ६ ऑक्टोबरला अंतिम झाली आहे. त्यात एकूण १२८ जागा आहेत. ही प्रभाग रचना अंतिम करताना सहा प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकसंख्येसह एस.सी. व एस.टी लोकसंख्येची आकडेवारी बदलल्याने त्या वर्गाच्या आरक्षणात बदल झाले आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रभागातील आरक्षण कसे असणार यावर इच्छुक व माजी नगरसेवकांना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी सर्वांचे डोळे आरक्षण सोडतीकडे लागले होते.
























Join Our Whatsapp Group