पिंपरी (Pclive7.com):- जद्गतगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी शुक्रवारी (६ जुलै) पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाली. यंदा वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव आणि रस्त्यांवरील खड्डे तसेच पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठी कोंडी झाली होती.
पिंपरी चिंचवड शहरात ग्रेडसेपरेटर मुळे तुलनेने कोंडी होत नाही. मेट्रोच्या कामामुळे ग्रेडसेपरेटरमध्ये एक लेन बंद आहे. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. शुक्रवारी पालखी शहरात दाखल होणार असल्याने पोलिस आणि प्रशासनाकडून त्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, केवळ पुण्यातील एसी केबिनमध्ये बसून करण्यात आलेल्या नियोजनामुळे शहरातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.
पालखी आणि वारकरी आकुर्डी येथील मुक्कामाच्या ठिकाणी पोहचली तरी, पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेले नव्हते. याचा परिणाम अंतर्गत रस्त्यांवर मोठी कोंडी झाली. याचा त्रास अंतर्गत रस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना झाला. रहिवासियांना घरी पोहचण्यास उशिर झाला. विशेष म्हणजे भरपावसात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना पावसाचा आणि फसलेल्या नियोजनाचा देखील त्रास सहन करावा लागला.
वाहतूक उपायुक्त नागपूर बंदोबस्ताला
पालखी सोहळ्यासाठी राज्यासह देशातून भाविक येत असतात. दरवर्षी पोलिसांकडून याचे नियोजन करण्यात येते. वारकऱ्यांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी याचा विचार करता वाहतूक विभागाचे प्रमुख शहरात थांबतात. मात्र, यंदा मंत्रीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांना नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. तर पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे हे आजारपणाच्या रजेवर आहेत. याचा परिणाम शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला.
























Join Our Whatsapp Group