
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड गोंधळ उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तळवडे गावठाणातील शेकडो मतदारांची नावे सरळ चिखली प्रभागात वळविल्याचा प्रकार उघड होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकारावर भाजपचे माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांनी प्रशासनाला जाब विचारत प्रशासनाची कानउघाडणी केली आहे.

मतदारांच्या नावांची चुकीची नोंद, दुसऱ्या प्रभागात जाणीवपूर्वक नावे वळविणे ही साधी चूक नसून निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत करणारी गंभीर बाब आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सुधारित मतदार यादी जाहीर करावी.” अशी मागणी शांताराम भालेकर यांनी केली आहे.
याबाबत शांताराम भालेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांची प्रारुप यादी प्रसिद्ध केली असून, यादीतील त्रुटी सुधारण्यासाठी हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी दि.२७ नोव्हेंबर पर्यंत मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मतदार यादींवर अभ्यास सुरू केला असून, याद्या दुरूस्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तळवडे गावठाण येथील यादी क्र.०७ चा समावेश चिखली प्रभाग क्र.०१ मध्ये केला गेला आहे. त्यामुळे भालेकर यांनी याबाबत आग्रही भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, “इतक्या मोठ्या प्रमाणावर नावे ‘नजरचुकीने’ जाणे अशक्य आहे. हा प्रकार साधा तांत्रिक दोष नसून, कोणाला तरी राजकीय लाभ मिळवून देण्यासाठी केलेला सरळ खोडसाळ प्रकार दिसून येतो. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे अत्यावश्यक आहे.” निवडणूक विभाग नेमका कुणाच्या इशाऱ्यावर चालतोय? प्रशासन कुणाच्या हातातील बाहुले बनले आहे का?” असा संतप्त सवाल भालेकर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, शांताराम बापू भालेकर म्हणाले की, प्रभाग क्र.१२ मधील अनेक मतदारांची नावे लगतच्या प्रभागात गेली आहेत. त्यामुळे मतदारांनी आपल्या प्रभागातील मतदार यादीतच आपले नाव असल्याबाबत खात्री करावी. नसेल, तर नाव समाविष्ट करण्याबाबत अर्ज करावा, जेणेकरून अंतिम यादीत योग्य सुधारणा करता येतील. हरकतीसाठी अर्ज करताना आधार कार्ड किंवा ओळखपत्र आणि पत्त्याचे पुरावे जोडणे अत्यावश्यक आहे. BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) आणि महापालिका प्रशासन अर्जाची पडताळणी करून योग्य सुधारणा करतील, ज्यामुळे मतदारांचा मतदानाचा हक्क त्यांच्या वास्तव प्रभागात सुनिश्चित होईल.

“हरकतीचा अर्ज आणि मार्गदर्शन माझ्या जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध आहे. मतदानाचा हक्क योग्य प्रभागात सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक मतदाराने त्वरित माझ्या संपर्क कार्यालयास भेट देऊन कार्यालय प्रतिनिधी विलास अबुज +91 7420-072030 याच्यांशी संपर्क करुन नावाची तपासणी करावी.” असे आवाहन शांताराम बापू भालेकर यांनी केले आहे.

























Join Our Whatsapp Group