पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक भाजपची निर्विवाद सत्ता आली. मात्र या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये अत्यंत अनपेक्षित निकाल लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. प्रस्थापित व वजनदार उमेदवारांचा पराभव झाला आहे, तर तुलनेने नवख्या चेहऱ्यांनी बाजी मारली आहे.

प्रभाग ८ मध्ये भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या सीमा सावळे यांना भाजपच्या डॉ. सुहास कांबळे यांनी धक्का दिला. याच प्रभागातून भाजपचेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांना राष्ट्रवादीच्या तुषार सहाणे यांनी कात्रजचा घाट दाखवला.
प्रभाग १६ मधून राष्ट्रवादीचे मातब्बर नेते मोरेश्वर भोंडवे यांना शिंदेसेनेचे शहरप्रमुख नीलेश तरस यांनी धूळ चारली. प्रभाग २० मध्येही लक्षणीय उलथापालथ झाली. राष्ट्रवादी (शरद पवार)च्या सुलक्षणा धर यांचा पराभव करून राष्ट्रवादी (अजित पवार)चे जितेंद्र ननावरे यांनी मागील उट्टे काढले. याच प्रभागात राष्ट्रवादीच्या नवख्या वर्षा जगताप यांनी भाजपच्या महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांच्यावर विजय मिळवला.

प्रभाग २१ मधील राष्ट्रवादीच्या प्रियंका कुदळे या जायंट किलर ठरल्या आहेत. त्यांनी भाजपच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा उषा वाघेरे यांना पराभूत करत मोठा धक्का दिला. प्रभाग ३२ मध्ये माजी महापौर माई ढोरे यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला ढोरे यांनी केला आहे. या प्रभागातील धक्कादायक निकालाबाबत सर्वत्र चर्चा आहे.






















Join Our Whatsapp Group